छिंदवाड्यावरून आणला ५.७० लाखाचा प्रतिबंधित तंबाखू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:43 IST2018-09-29T00:41:15+5:302018-09-29T00:43:15+5:30
अन्न व औषध प्रशासन विभागाने गुप्त माहितीच्या आधारावर छिंदवाडा येथून कारने नागपुरात आणलेला लाखो रुपयाचा प्रतिबंधित तंबाखू व पान मसाला जप्त केला.

छिंदवाड्यावरून आणला ५.७० लाखाचा प्रतिबंधित तंबाखू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाने गुप्त माहितीच्या आधारावर छिंदवाडा येथून कारने नागपुरात आणलेला लाखो रुपयाचा प्रतिबंधित तंबाखू व पान मसाला जप्त केला.
एफडीएला २६ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजता सावनेरकडून कार क्रमांक एमएच/३१/ईए/१४९७ मध्ये प्रतिबंधित तंबाखू आणि इतर पदार्थ मोठ्या संख्येने आणले जात असल्याची माहिती मिळाली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सावनेर कार्यालयाच्या निरीक्षकाशी संपर्क साधण्यात आला. सावनेरजवळ एफडीएच्या चमूने संदिग्ध कारला रोखले आणि तपासणी केली. ही कार नागपूरच्या कार्यालयात आणण्यात आली. त्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि रजनीगंधा पान मसालासह ५ लाख ६९ हजार ४५० रुपयचा माल जप्त करण्यात आला. विभागाने गाडी जप्त केली असून कार चालक सुनील भिमटेचा वाहन परवाना रद्द करण्याची शिफारस प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय नागपूरला केली आहे. ही कारवाई एफडीएचे सहायक आयुक्त (अन्न) मिलिंद देशपांडे यांच्या नेतृत्वात अन्न सुरक्षा अधिकारी अनंत चौधरी, अभय देशपांडे व चमूने केली.