पावणेदोन लाखाची रोकड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:07 IST2021-05-07T04:07:47+5:302021-05-07T04:07:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पारडी येथील क्रिकेट अड्ड्यावरील कारवाईच्या वेळी पळून गेलेला बुकी आणि त्याचे दोन साथीदार अशा ...

52 lakh cash confiscated | पावणेदोन लाखाची रोकड जप्त

पावणेदोन लाखाची रोकड जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पारडी येथील क्रिकेट अड्ड्यावरील कारवाईच्या वेळी पळून गेलेला बुकी आणि त्याचे दोन साथीदार अशा तिघांना परिमंडळ ५ च्या पोलीस उपायुक्ताच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून पावणेदोन लाखाची रोकड जप्त करण्यात आली.

रोहन दिलीपसिंग दीक्षित (रा. चंद्रनगर, पारडी नाका), परीक्षित अनिल बघले (रा. पाताळेश्वर रोड, महाल) आणि नवीन बच्छराज खमेले (रा. इतवारी) अशी या तिघांची नावे आहेत.

परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांच्या विशेष पथकाने ३० एप्रिलला पारडीत सुरू असलेल्या क्रिकेट अड्ड्यावर छापा घातला होता. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन रोहन दीक्षित हा बुकी फरार झाला होता. त्याचा शोध घेऊन पोलिसांनी बुधवारी (दि. ५) त्याला ताब्यात घेतले. त्याच्या घरी तपासणी केली असता एक लाख, पाच हजारांची रोकड सापडली. त्याच्या चौकशीत त्याने परीक्षित बघले आणि नवीन खमेले या दोन साथीदारांची नावे सांगितली. त्यावरून या दोघांनाही पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून अनुक्रमे ४१ हजार, ५०० तसेच २८ हजार ५०० रुपये जप्त केले. त्यांच्याविरुद्ध पारडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलीस आयुक्त नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील सहाययक पोलीस निरीक्षक विजय भिसे, उपनिरीक्षक महाडिक तसेच नायक सूरज भारती, दिनेश यादव, हरीश इंगळे, चेतन जाधव आणि रवींद्र राऊत यांनी ही कामगिरी बजावली.

Web Title: 52 lakh cash confiscated