५००० ठेवीदारांचे १५०० कोटी धोक्यात?

By Admin | Updated: May 10, 2014 23:42 IST2014-05-10T23:42:18+5:302014-05-10T23:42:18+5:30

आर्थिक गुन्हे शाखेने वासनकर समूहाविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदारांचे हित संरक्षक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर या समूहामध्ये अंदाजे ५००० ठेवीदारांनी गुंतविलेल्या ठेवींच्या रकमेवर प्रश्नचिन्ह उभे...

5000 depositors threaten 1500 crore? | ५००० ठेवीदारांचे १५०० कोटी धोक्यात?

५००० ठेवीदारांचे १५०० कोटी धोक्यात?

वासनकर समूहाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू

सोपान पांढरीपांडे- नागपूर

आर्थिक गुन्हे शाखेने वासनकर समूहाविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदारांचे हित संरक्षक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर या समूहामध्ये अंदाजे ५००० ठेवीदारांनी गुंतविलेल्या ठेवींच्या रकमेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे़ सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे संबंधित आर्थिक गुन्हे शाखा प्रशांत वासनकरांना येत्या एक दोन दिवसात अटक करण्याची शक्यता आहे़ वाचकांना हे आठवतच असेल की गेल्या डिसेंबर महिन्यात लोकमतने सर्वप्रथम वासनकरांचे आर्थिक घोटाळे उघडकीस आणले होते़ वासनकर एकूण आठ प्रकारच्या गुंतवणूक योजना चालवित होते आणि गुंतवणूकदारांना वार्षिक २४ ते ६० टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवत होते़ यामध्ये सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे अडीच वर्षात अडीच पट रक्कम व चार वर्षात तिप्पट रक्कम. या दोन योजनांना भरघोस पाठिंबा होता़जगातील कुठलीही व्यापारी संस्था असे भरमसाट व्याज देऊन नफ्यात चालू शकत नाही़ वासनकरांचेही हेच झाले़ परंतु या आमिषांना बळी पडून अक्षरश: हजारो लोकांनी वासनकरांना आपले निढळाच्या घामाचे पैसे दिले. आता हे पैसे आता बुडण्याच्या बेतात आहे़ दरम्यान, वासनकरांवरील पोलीस कारवाईच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये आल्यानंतर आज सकाळपासून त्यांच्या हिल रोडवरील कार्यालयासमोर ठेवीदारांनी एकच गर्दी केली़ वासनकर कार्यालयात हजर नव्हते आणि त्यांच्या जवळपास ५० कर्मचार्‍यांना वासनकरांबद्दल कुठलीही माहिती नव्हती़ ठेवीदारांनी या कर्मचार्‍यांवरच परतफेडीसाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला़ त्यामुळे लोकांना समजवताना कर्मचार्‍यांची तारांबळ उडत होती़ अशा एका बैठकीत सदर वार्ताहरसुद्धा उपस्थित होता़ (कृपया फोटो पाहा)़वासनकरांच्या आॅफिससमोर गोळा झालेले बहुतेक ठेवीदार मध्यमवर्गीय होते़ त्यांनी एक लाखांपासून ३ कोटींपर्यंत रक्कम गुंतविल्याची माहिती मिळाली़ परंतु मीडियाशी बोलताना कुणीही नाव सांगायला तयार नव्हते़ महावितरणमधून निवृत्त झालेले एक मुख्य अभियंतासुद्धा गर्दीत होते़ आम्हाला पेन्शन मिळत नाही म्हणून वासनकरांकडे निवृत्तीनंतर मिळालेली सर्व रक्कम ३५ लाख रुपये मी गुंतविली आहे़ त्यावर मला दरमहा व्याज मिळत होते़ आता हे व्याज बंद झाले तर माझे कुटुंबच अडचणीत येईल, असे त्यांनी सांगितले़ एका राष्ट्रीयकृत बँकेचा कर्मचारी असलेला ठेवीदार म्हणाला माझे १८ लाख रुपये वासनकरांकडे आहे़ ती रक्कम मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी ठेवली होती़ आता ही रक्कम बुडली तर काय होईल, या चिंतेने मी हैराण झालो आहे़ वर्मा ले-आऊटमधील एक डॉक्टरही गर्दीत होते़ वासनकरांविरुद्ध पोलिसात तक्रार देणारे बिल्डर विवेक पाठक यांनाच या डॉक्टरने दोष दिला़ वासनकर पैसे देण्यासाठी सक्षम आहे, पण विवेक पाठक यांनी सर्व गेम बिघडविला, असा या डॉक्टरचा आरोप होता़ एका छोट्या व्यावसायिकाचे वासनकरांकडे ८ लाख रुपये होते़ त्यापैकी ३ लाख रुपये परत मिळाले़ आता वासनकरांकडे त्याचे ५ लाख रुपये आहे़ ३ लाख रुपये परत मिळाले म्हणून हा ठेवीदार परमेश्वराचे आभार मानत होता़ वासनकर समूहाचे पतन कसे झाले, याबद्दल अनेक गुंतवणूकदार चर्चा करीत होते़ वासनकरांना पैशाची चणचण दोन वर्षांपासून जाणवत होती आणि त्यांनी गुंतवणूकदारांना टाळणे सुरू केले होते़, अशी माहिती आहे़ याचबरोबर वासनकरांनी ठेवीदारांना गप्प करण्यासाठी गुंडांची मदत घेतल्याचीही चर्चा होती़ लोकमतने वासनकरांचा घोटाळा पाच महिन्यापूर्वीच उघडकीस आणला होता, त्याबद्दल लोकमतचे अभिनंदन होत होते़ गेल्या तीन वर्षात नागपूरमध्ये उघडकीस आलेला हा तिसरा गुंतवणूक घोटाळा आहे़ तीन वर्षांपूर्वी प्रमोद अग्रवाल याच्या महादेव लॅण्ड डेव्हलपर्सने जनतेला अंदाजे ५०० कोटी रुपयाने फसविल्याचे प्रकरण गाजले होते़ गेल्यावर्षी समीर जोशीच्या श्रीसूर्या समूहाने ठेवीदारांना २५० कोटी रुपयांची टोपी घातल्याचे उघडकीस आले होते़ आता वासनकरांवर पोलीस कारवाई होत आहे़ नागपूरच्या इतिहासातील हा शेवटचा घोटाळा ठरणार काय, हे आता काळच सांगेल़

Web Title: 5000 depositors threaten 1500 crore?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.