सात वर्षांत ५० वाघांचा मृत्यू!
By Admin | Updated: July 29, 2015 02:50 IST2015-07-29T02:50:53+5:302015-07-29T02:50:53+5:30
जाणकारांच्या मते, सध्या जगातील भारतासह केवळ ब्रह्मदेश, थायलंड, चीन व रशिया याच देशातील जंगलात वाघाचे अस्तित्व शिल्लक राहिले आहे.

सात वर्षांत ५० वाघांचा मृत्यू!
वाघांच्या संवर्धनासाठी आज
‘ग्लोबल टायगर डे’ साजरा करणार
जाणकारांच्या मते, सध्या जगातील भारतासह केवळ ब्रह्मदेश, थायलंड, चीन व रशिया याच देशातील जंगलात वाघाचे अस्तित्व शिल्लक राहिले आहे. इतर सर्व देशातील वाघ प्राणिसंग्रहालयात पोहोचले आहेत. जंगली वाघांपैकी ५० टक्के वाघ भारतात आहे. मात्र असे असले, तरी भारतातील वाघसुद्धा आज दुर्मिळ होत चालला आहे. वन विभागाच्या आकडेवारीनुसार २०१२ मध्ये सर्वांधिक म्हणजे, १३ वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सात वाघांचा नैसर्गिक मृत्यू झाला असून, तीन वाघांचा अपघाती व तीन वाघांच्या शिकारी झाल्या आहेत. अशाप्रकारे मागील सात वर्षांत एकूण ३० वाघांचा नैसर्गिक, ११ वाघांचा अपघाती व ९ वाघांच्या शिकारी झाल्या आहेत. यावर्षी २३ एप्रिल ते २९ जूनदरम्यान एकाच चंद्रपूर जिल्ह्यात चार वाघांचा मृत्यू झाला. शिवाय एका वाघाचा जळगाव जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. सहा महिन्यात पाच वाघांच्या या मृत्यूने अक्षरश: वन विभाग हादरला आहे. यात वाघाच्या मृत्यूची पहिली घटना १ एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्यातील दौलाखेडा येथील कम्पार्टमेंट क्र. ५७२ मध्ये उघडकीस आली. त्यापाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यातील चांदा डिव्हिजनमध्ये २३ एप्रिल रोजी जुनोना रेंजमधील कम्पार्टमेंट क्र. ४७६ मध्ये दुसरी घटना, ब्रम्हपुरी डिव्हिजनमधील तळोधी रेंजमध्ये तिसरी, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर परिसरात चौथी व सिंदेवाही रेंजमधील काघाटा येथील कम्पार्टमेंट क्र. १६८ मध्ये पाचवी घटना उघडकीस आली. या घटना रोखण्यात वन विभाग अपयशी ठरत आहे. वाघाप्रमाणेच बिबट हासुद्धा जंगलातील महत्त्वाचा प्राणी समजल्या जातो. परंतु अलीकडे बिबटसुद्धा नामशेष होऊ लागला आहे. मागील सहा वर्षांत राज्यातील ३२४ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. यात २००९ मध्ये ४८, २०१० मध्ये ५७, २०११ मध्ये ७०, २०१२ मध्ये ६८, २०१३ मध्ये ४३ व २०१४ मध्ये ३८ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज वाघासोबतच बिबट्यांनाही वाचविण्याची गरज निर्माण झाली आहे.
वाघाला तस्करांचा धोका
साधारण २० व्या शतकाच्या सुरुवातीला देशात एक लाखांपेक्षा अधिक वाघांचा अधिवास होता. परंतु इंग्रज देश सोडून जाताना ती संख्या ४० हजारांपर्यंत खाली आली. दरम्यान हौस म्हणून वाघाची शिकार केली जात होती. ब्रिटिश देश सोडून गेल्यावरही देशात तोच प्रघात कायम होता. वाघांची ती चिंताजनक परिस्थिती पाहून काही वन्यजीव रक्षकांनी अशा हौशी शिकारीविरुद्ध आवाज उठविला होता. तसेच ‘टायगर प्रोजेक्ट’ हा वन्यजीव संवर्धन कार्यक्रमातील सर्वांत यशस्वी टप्पा मानल्या जातो. या माध्यमातून अनेक जंगलांना अभयारण्याचे स्थान मिळाले, तसेच अनेक राष्ट्रीय उद्यानांची घोषणा करण्यात आली. या व्याघ्र प्रकल्पानंतर सामान्य नागरिकांचा वन्यजीवांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. लोकांमध्ये वन्यजीवांबद्दल आस्था, कुतूहल व शास्त्रीय माहितीची ओढ निर्माण होऊ लागली. परिणामत: १९९० मध्ये देशातील वाघांची संख्या साडे चार ते पाच हजारांपर्यंत पोहोचली. परंतु याचवेळी आंतरराष्ट्रीय तस्कारांचे पुन्हा वाघांकडे लक्ष वेळले. यातून शिकारींचे प्रमाण वाढले आणि २००८ पर्यंत देशात केवळ १३०० वाघ शिल्लक राहिले.