५0 टक्के पूर्णकालीन शिक्षक हवेत
By Admin | Updated: May 31, 2014 00:58 IST2014-05-31T00:58:15+5:302014-05-31T00:58:15+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात २0१४-१५ या शैक्षणिक सत्रात प्रवेशासाठी महाविद्यालयांत मंजूर क्षमतेच्या ५0 टक्के पूर्णकालीन शिक्षक असणे आवश्यक राहणार आहे.

५0 टक्के पूर्णकालीन शिक्षक हवेत
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात २0१४-१५ या शैक्षणिक सत्रात प्रवेशासाठी महाविद्यालयांत मंजूर क्षमतेच्या ५0 टक्के पूर्णकालीन शिक्षक असणे आवश्यक राहणार आहे.
नागपूर विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने किमान शिक्षक संख्या ठरविण्यासाठी दोन समित्या स्थापन केल्या होत्या. या समितींच्या अहवालाच्या आधारावर विद्यापीठाने शुक्रवारी अधिसूचना काढली. ही अट २0१४-१५ व पुढील सत्रातील प्रथम वर्षाच्या व सत्राच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी लागू राहील.
पारंपरिक, व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सर्व महाविद्यालयांना ही अट लागू असेल. विद्यापीठातर्फे मान्यता देण्यात आलेल्या शिक्षकांचा ५0 टक्क्यांत समावेश असावा, असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगासह इतर सर्व केंद्रीय शैक्षणिक परिषदांना निर्धारित संख्येच्या प्रमाणातच शिक्षक नियुक्तीचा नियम आहे. असे असले तरी मंजूर पदांच्या ५0 टक्के शिक्षक नियुक्त करणार्या महाविद्यालयांना प्रवेशाचा अधिकार देण्यात आला आहे.
ज्या अभ्यासक्रमात भाषेचा विषय अनिवार्य असेल तेथे ५0 टक्के शिक्षकसंख्येत भाषेचा एक नियमित शिक्षक असणे आवश्यक राहणार आहे. ही अट स्थापना होऊन ४ वर्ष पूर्ण झालेल्या महाविद्यालयांना लागू असेल, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विज्ञान शाखेत विषयनिहाय शिक्षकांच्या नेमणुका करणे आवश्यक राहणार आहे. (प्रतिनिधी)
महाविद्यालयांना इशारा
जी महाविद्यालये संबंधित अटींचे पालन करणार नाहीत त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वरील अटींचे पालन करण्याची जबाबदारी संस्थाचालकांची व प्राचार्यांंची आहे. या अटींचे उल्लंघन करून प्रवेश देणार्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांंच्या परीक्षा विद्यापीठाकडून घेतल्या जाणार नाहीत. शिवाय कायदेशीर कारवाईदेखील करण्यात येईल, असा इशारा विद्यापीठाने दिला आहे. नामांकन व परीक्षा अर्ज सादर करताना संस्थाचालकांना अटींची पूर्तता केल्याचे हमीपत्र द्यावे लागणार आहे.