हैदराबादच्या व्यापाऱ्याला ५० लाखांचा गंडा
By Admin | Updated: October 10, 2015 03:07 IST2015-10-10T03:07:24+5:302015-10-10T03:07:24+5:30
हैदराबादच्या एका व्यापाऱ्याला त्याच्या स्थानिक कर्मचाऱ्याने ५० लाखांचा गंडा घातला.

हैदराबादच्या व्यापाऱ्याला ५० लाखांचा गंडा
नागपूर : हैदराबादच्या एका व्यापाऱ्याला त्याच्या स्थानिक कर्मचाऱ्याने ५० लाखांचा गंडा घातला. इन्तरवाक कमरूद्दीन खान (वय ३४) असे आरोपीचे नाव आहे. तो बोरगांवमधील प्रशांत कॉलनीत राहतो.डब्ल्यूएलसी कॉलेज रोड, हैदराबाद येथील आदम अली (वय ३७) हे मोबाईल व्यापारी आहेत. त्यांचे अनेक ठिकाणी मोबाईल शॉप आणि सर्व्हिस सेंटर आहे.
नागपुरातील एम्प्रेस मॉलमध्ये पहिल्या माळ्यावर त्यांचे ‘कॉमवेल मोबाईल’ सर्व्हिस सेंटर होते. येथे आरोपी इन्तरवाक खान ‘शॉप इन्चार्ज’ म्हणून कार्यरत होता. त्याने पदाचा दुरुपयोग करीत ग्राहकांच्या बनावट नोंदी करून त्यांच्या नावाने वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल्सचे सुटे भाग बोलवून घेतले. खोटे बिल तयार करून मोबाईलसह लाखोंचे सुटे भाग परस्पर विकले. त्याचप्रमाणे खराब झालेले साहित्य हैदराबादला पाठवून तो ट्रान्सपोर्टमध्ये खराब झाल्याचे सांगत अली यांच्या कंपनीला ५० लाख रुपयांचा गंडा घातला. १८ सप्टेंबरला ही बनवाबनवी उघड झाली. आदम अली यांनी आरोपी खानला विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे अली यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. गणेशपेठ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.(प्रतिनिधी)