नागपुरात चिकनगुनियाचे ५ रुग्ण आढळले, भूपेशनगरात अलर्ट; मनपाच्या पथकाद्वारे सर्वेक्षण
By मंगेश व्यवहारे | Updated: June 12, 2024 15:26 IST2024-06-12T15:26:10+5:302024-06-12T15:26:53+5:30
शहरात उन्ह आणि ढगाळ वातावरणामुळे वातावरणात उम्मस दाटली आहे.

नागपुरात चिकनगुनियाचे ५ रुग्ण आढळले, भूपेशनगरात अलर्ट; मनपाच्या पथकाद्वारे सर्वेक्षण
मंगेश व्यवहारे, नागपूर: गिट्टीखदान परिसरातील भूपेशनगरात चिकन गुनिया सदृश्य साथीच्या आजाराने ग्रस्त ५ रुग्ण आढळले आहे. त्यामुळे मनपाचा आरोग्य विभाग अलर्ट झाला असून, आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर व आरोग्याची संपूर्ण यंत्रणेकडून परिसरात सर्वेक्षण करण्यात येत आहे.
शहरात उन्ह आणि ढगाळ वातावरणामुळे वातावरणात उम्मस दाटली आहे. त्वचा चिपचिपी झाली असून, घरोघरी कुलरचा वापर अधिक वेळ होत आहे. कुलरमुळे डासांचा उच्छाद वाढला असून साथीच्या आजार बळावले आहे. गिट्टीखदान परिसरातील भूपेशनगर या पॉश वस्त्यांमध्ये चिकन गुनियाचे ५ रुग्ण आढळले आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून महापालिकेच्या आरोग्य विभागाने उपायोजना व सर्वेक्षण सुरू केले आहे. सर्वेक्षणात बऱ्याच घरांमध्ये तापाने फणफणलेले रुग्ण आढलले आहे.
घरोघरी जावून रुग्णांचा शोध
परिसरात आशा वर्कर कडून ताप आलेल्या रुग्णांचा शोध घेतला जात आहे. घरोघरी जाऊन पाणी साठवण टाक्यांमध्ये डासांच्या अळ्या व अंडी नष्ट करणारी औषधे टाकली जात आहेत. निरुपयोगी साहित्य, टायर, भंगार व फुटक्या वस्तूंची विल्हेवाट लावण्याचे आवाहन मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले आहे.