मेडिकलच्या निवासी डॉक्टरांसाठी ४३ कोटींचे वसतिगृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:32 IST2019-01-15T00:31:42+5:302019-01-15T00:32:49+5:30
जर्जर झालेल्या व अर्धवट सोयींच्या वसतिगृहापासून मेडिकलच्या निवासी डॉक्टरांची सुटका होणार आहे. मेडिकल प्रशासनाच्या अथक परिश्रमानंतर ४३ कोटींच्या तळमजल्यासह चार मजली वसतिगृहाच्या बांधकामाला रविवारपासून सुरुवात झाली आहे. २५० खोल्या असलेली ही इमारत पर्यावरणपूरक म्हणजे ‘ग्रीन बिल्डिंग’ असेल. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ही पहिली इमारत ठरणार आहे.

मेडिकलच्या निवासी डॉक्टरांसाठी ४३ कोटींचे वसतिगृह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जर्जर झालेल्या व अर्धवट सोयींच्या वसतिगृहापासून मेडिकलच्या निवासी डॉक्टरांची सुटका होणार आहे. मेडिकल प्रशासनाच्या अथक परिश्रमानंतर ४३ कोटींच्या तळमजल्यासह चार मजली वसतिगृहाच्या बांधकामाला रविवारपासून सुरुवात झाली आहे. २५० खोल्या असलेली ही इमारत पर्यावरणपूरक म्हणजे ‘ग्रीन बिल्डिंग’ असेल. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ही पहिली इमारत ठरणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिळून ५७२ निवासी डॉक्टर आपली सेवा देतात. या डॉक्टरांच्या निवासासाठी ‘मार्ड’ वसतिगृह व वसतिगृह क्रमांक सहा, तर २७ खोल्यांचे सुपर स्पेशालिटी हॉस्टेल परिसरात वसतिगृह आहे. निवासी डॉक्टरांच्या तुलनेत हे वसतिगृह कमी पडत होते. परिणामी, एका खोलीत दोन किंवा त्या पेक्षा जास्त डॉक्टरांना एकत्र रहावे लागायचे. यात ‘मार्ड’चे वसतिगृह जुने व जीर्ण झाले आहे. येथे गडरलाईन पासून पाण्याची समस्या आहे. ही इमारतच मोडकळीस आल्याने स्वच्छतेला वाव नव्हता. २४ तास वैद्यकीय सेवेत असणाऱ्या निवासी डॉक्टरांसाठी हे वसतिगृह आरामदायी नव्हते. येथील गैरर्सोंना घेऊन निवासी डॉक्टर नेहमीच तक्रारीचा सूर आळवत होते. विशेष म्हणजे, तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मेडिकलमध्ये घेतलेल्या ‘कॉफी विथ स्टुडंटस्’मध्ये तर निवासी डॉक्टरांनी वसतिगृहातील तक्रारींचा पाऊसच पाडला होता. यात प्रामुख्याने अस्वच्छता, तुंबलेल्या ड्रेनेज लाईन, घाणीत असलेले स्वच्छता गृह, पाण्याचा तुटवडा आदी तक्रारी होत्या. आव्हाड यांनी या तक्रारींना घेऊन अधिष्ठात्यांना धारेवर धरले होते. याच दरम्यान मेडिकल व शासकीय दंत महाविद्यालयाच्या संयुक्त समितीने वसतिगृहांची पाहणी करून नूतनीकरणाचा प्रस्ताव मंत्र्यांकडे पाठविला होता. परंतु इमारतच मोडकळीस आल्याने नवीन इमारतीचा प्रस्ताव अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी पाठविला. त्यांनी स्वत:हून यासाठी पाठपुरावा केला. अखेर शासनाने निवासी डॉक्टरांच्या समस्या लक्षात घेऊन नव्या वसतिगृहासाठी ४३ कोटींना प्रशासकीय मंजुरी दिली. यातील पहिल्या टप्प्यातील निधी मेडिकलच्या तिजोरीत जमाही झाला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच १३ जानेवारी रोजी वसतिगृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी केले. बांधकाम पूर्ण झाल्यावर याचे विधीवत उद्घाटन केले जाईल, असेही डॉ. निसवाडे म्हणाले.
तळमजल्यासह चार मजलीची इमारत
निवासी डॉक्टरांचे २५० खोल्यांचे हे वसतिगृह तळमजल्यासह चार मजलीचे असणार आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक खोलीला स्वच्छतागृह, आरामदायी निवासाची सोय असणार आहे. प्रत्येक खोलीमध्ये एक डॉक्टर राहील असी सोय असणार आहे. इमारतीत अद्ययावत स्वरूपातील ‘जीम’ व ‘मेस’ राहणार आहे.
पर्यावरणपूरक इमारत
वसतिगृहाची इमारत ही पर्यावरण पूरक असणार आहे. या ‘ग्रीन बिल्डींग’मध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा जास्तीत जास्त वापर केला जाणार आहे. हे वसतिगृह ट्रॉमा केअर सेंटरच्या मागील दोन एकर परिसरात होणार असल्याने डॉक्टरांना वसतिगृहातून लवकर रुग्णालयात पोहचणे शक्य होईल.
अत्याधुनिक सोयी सुविधांचे वसतिगृह
मेडिकलमधील मुलींच्या वसतिगृहाचे नूतनीकरण पूर्ण झाले असून लवकरच मुलांच्या वसतिगृहांचे नूतनीकरण होणार आहे. निवासी डॉक्टरांच्या नव्या वसतीगृहाच्या बांधकामाला रविवारपासून सुरुवात झाली आहे. अत्याधुनिक सोई सुविधांनी हे वसतीगृह सज्ज असेल. विशेष म्हणजे ही ‘ग्रीन बिल्डिंग’ असणार आहे. शासन निवासी डॉक्टरांच्या समस्यांबाबत गंभीर असल्यामुळेच या नव्या वसतिगृहाला मंजुरी मिळाली आहे.
-डॉ. अभिमन्यू निसवाडे
अधिष्ठाता, मेडिकल