शांतिवन चिंचोलीसाठी केंद्राकडून आले ४.२५ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:16 IST2021-02-20T04:16:03+5:302021-02-20T04:16:03+5:30
नागपूर : शांतिवन चिंचोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तुसंग्रहालयासाठी केंद्र शासनाने ४.२५ कोटी रुपयांचा निधी वितरित ...

शांतिवन चिंचोलीसाठी केंद्राकडून आले ४.२५ कोटी
नागपूर : शांतिवन चिंचोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तुसंग्रहालयासाठी केंद्र शासनाने ४.२५ कोटी रुपयांचा निधी वितरित केला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त नागपूरजवळील शांतिवन (चिंचोली) येथील बाबासाहेबांच्या स्मृतिसंग्रहालयाच्या पुनर्निर्माणासाठी केंद्र शासनाने २०१६ मध्ये १७.३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यापैकी पहिला हप्त्याचा ४.२५ कोटी रुपयांचा निधी नोव्हेंबर २०१६मध्ये दिला होता. दुसऱ्या हप्त्याचा ४.२५ कोटी रुपयांचा निधी १७ फेब्रुवारी रोजी वितरित करण्यात आला.
शांतिवनमधील संग्रहालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जतन करून ठेवल्या आहेत. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खासगी आयुष्याशी निगडित जवळपास ४०० पेक्षा अधिक वस्तू आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर वापरत असलेले कपडे यामध्ये सदरा, कोट, कुर्ते, टाय, मोजे आहेत. यासह वकिली करीत असतानाचा बॅरिस्टर गाऊन येथे आहेत. त्यांची हस्तलिखित पत्रे, ग्रामोफोन, छड़ी, टेबल-खुर्ची, पेन, टाइपराइटर अशा अनेक वस्तू या संग्रहालयात आहेत.
शांतिवन चिंचोलीच्या संग्रहालयाचे लोकार्पण ६ डिसेंबर २०२१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी होईल, अशी अपेक्षा डॉ. आंबेडकर फाउण्डेशनचे उपाध्यक्ष अशोक मेंढे यांनी व्यक्त केली आहे. निधी उपलब्ध करून दिल्याबाबत शंतिवन चिंचोलीचे कार्यवाह संजय पाटील यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहे.
----------------