मतदानाअगोदर ४१ क्रूड बॉम्ब जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:08 IST2021-04-05T04:08:14+5:302021-04-05T04:08:14+5:30
भंगोर : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारतोफा रविवारी थंडावल्या. राज्यात ६ एप्रिल रोजी ३१ जागांवर निवडणूक होणार ...

मतदानाअगोदर ४१ क्रूड बॉम्ब जप्त
भंगोर : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारतोफा रविवारी थंडावल्या. राज्यात ६ एप्रिल रोजी ३१ जागांवर निवडणूक होणार आहे. मागील टप्प्यातील हिंसाचारानंतर शांततेत मतदान व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे. दरम्यान, दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातून सुरक्षा यंत्रणांनी ४१ क्रूड बॉम्ब जप्त केले.
भंगोर विधानसभा क्षेत्रातील प्राणगंज ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पदमापुकूर येथे क्रूड बॉम्ब असल्याची गोपनीय माहिती आयोगाला मिळाली होती. आयोगाच्या निर्देशांनुसार पश्चिम बंगाल पोलीस व मतदान अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी धाडी टाकल्या व ४१ क्रूड बॉम्ब जप्त केले. या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
दरम्यान, तिसऱ्या टप्प्यात हावडा, हुगळी आणि दक्षिण चौबीस परगणा या जिल्ह्यातील ३१ जागांवर मतदान होणार आहे. रविवारी सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्या. रविवार असल्याने बहुतांश उमेदवारांनी शक्तिप्रदर्शनावर भर दिला. याशिवाय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारसभादेखील झाल्या.
आयोगाकडून परत अधिकाऱ्यांच्या बदल्या
दरम्यान, मतदानाअगोदर अलीद्वारपूर, हुगली, उत्तर व दक्षिण चौबीस परगणा येथील पोलीस अधिकाऱ्यांच्या निवडणूक आयोगाकडून बदल्या करण्यात आल्या. यात अलीद्वारपूरचे पोलीस अधीक्षक, हुगलीतील पोलीस उपायुक्त यांचादेखील समावेश आहे. बदल्यांवरून तृणमूलने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
तिसऱ्या टप्प्यातील मतदान
एकूण जागा : ३१
रिंगणातील उमेदवार : २०५
मतदार : ७८,५२,४२५
पोलिंग बूथ : १०,८७१