नागपुरात ५० हजारांचे ४०८ किलो प्लास्टिक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 23:23 IST2019-12-17T23:22:03+5:302019-12-17T23:23:33+5:30
लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी कळमना चिखली रोड येथील गोदावरी पॉलिमर्स येथे छापा घालून ५० हजार रुपये किमतीचे ४०८ किलो प्लास्टिक जप्त केले.

नागपुरात ५० हजारांचे ४०८ किलो प्लास्टिक जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात प्लास्टिकबंदी आहे. प्लास्टिक उत्पादन वापरणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी कळमना चिखली रोड येथील गोदावरी पॉलिमर्स येथे छापा घालून ५० हजार रुपये किमतीचे ४०८ किलो प्लास्टिक जप्त केले.
गोदावरी पॉलिमर्स येथे मोठ्या प्रमाणात प्लास्टिकची साठवणूक केली असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने गोदावरी पॉलिमर येथे तपासणी केली असता खर्रा घोटण्याचे प्लास्टिक आणि प्लास्टिक पिशव्या असा एकूण ४०८ किलो प्लास्टिकचा साठा आढळून आला. या जप्त कलेल्या प्लास्टिकची किंमत ५० हजार रुपये असल्याचे एनडीएसच्या पथकाने सांगितले.
गोदावरी पॉलिमरच्या मालकावर प्लास्टिक बंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. पहिला गुन्ह्यातील दंड म्हणून पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला व पुढे प्लास्टिकचा साठा न करण्यासंदर्भात ताकीद देण्यात आली. एनङीएसद्वारे प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई करतानाच शहरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, भिंती विद्रुप करणे या व्यतिरिक्त शहराच्या सौंदर्यास बाधा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध नियमित कारवाई सुरू आहे. शहरातील नागरिकांनी स्वत:ची जबाबदारी व कर्तव्य ओळखून उपद्रव पसरविणाऱ्यांची माहिती महापालिकेला देण्याचे आवाहन महापौर संदीप जोशी आणि आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे.