नागपूर परिमंडळात वर्षभरात चार हजारावर वीजचोऱ्या
By आनंद डेकाटे | Updated: April 26, 2024 13:20 IST2024-04-26T13:17:40+5:302024-04-26T13:20:50+5:30
Nagpur : ७.२६ कोटींचा वीजचोऱ्या उघड; १४९ वीजचोरांविरोधात गुन्हे दाखल

Stealing of Electricity in Nagpur
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीजचोरीविरोधात कठोर भुमिका घेत महावितरणच्या नागपूर परिमंडळाने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये तब्बल ४ हजार ५० वीजचोऱ्या उघडकीस आणल्या. वीज वापर, वाढीव वीज भार, वीज मीटरमध्ये फेरफार, वाहिनीवर आकडा टाकणे आदी प्रकारच्या या वीज चोरी आहेत. या सर्व प्रकारातून झालेल्या वीजचोरीचे मुल्य तब्बल ७ कोटी २६ लाख ४४ हजार असून या सर्व प्रकरणांत १४९ वीजचोरांविरोधात भारतीय विद्युत कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
२०२३-२४ या आर्थिक वर्षात मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या नेतृत्वात महावितरणच्या नागपूर परिमंडलांतर्गत असलेल्या नागपूर शहर, नागपूर ग्रामिण आणि वर्धा मंडलात वीजचोरी विरोधात आक्रमक भूमिका घेत सातत्याने ठिकठिकाणी वीजचोरी विरोधात मोहीम राबविण्यात आली. यात नागपूर शहर मंडलात बेकायदेशीर वीज वापर, वाढीव वीज भार आणि चुकीच्या वीज दराची २६३, वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरीची १३३१ तर वीज मीटर मध्ये फ़ेरफ़ार आणि अन्य प्रकारच्या थेट वीजचोरीच्या ७८९ प्रकरणांचा समावेश असून या वीजचोरीचे रक्कम तब्बल ४ कोटी ४६ लाख २१ हजार इतकी आहे. यापैकी १५९३ ग्राहकांवर तडजोडीपोटी ५२ लाख ९२ हजारांचा दंड आकारण्यात आला असून १४६ वीजचोरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. तर नागपूर नागपूर मंडलात बेकायदेशीर वीज वापर, वाढीव वीज भार आणि चुकीच्या वीज दराची २२, वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरीची ५२६ तर वीज मीटर मध्ये फ़ेरफ़ार आणि अन्य प्रकारच्या थेट वीजचोरीच्या ३७१ प्रकरणांचा समावेश असून या वीजचोरीचे रक्कम तब्बल १ कोटी ५४ हजार इतकी आहे. यापैकी ६०७ ग्राहकांवर तडजोडीपोटी १४ लाख ८३ हजारांचा दंड आकारण्यात आला आले.
नागपूर पाठोपाठ महावितरणने वर्धा जिल्ह्यात देखील वीजचोरांविरोधात कारवाईचा धडाका कायम ठेवीत वर्षभरात बेकायदेशीर वीज वापर, वाढिव वीज भार आणि चुकीच्या वीज दराची ४९, वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरीची १४७ तर वीज मीटर मध्ये फ़ेरफ़ार आणि अन्य प्रकारच्या थेट वीजचोरी ५३२ प्रकरणे उघडकीस आणली. या वीजचोरीचे रक्कम तब्बल १ कोटी ७९ लाख ६८ हजार इतकी आहे. यापैकी ४९८ ग्राहकांवर तडजोडीपोटी १९ लाख ४६ हजाराचा दंड आकारण्यात आला.
- अशी आहेत वीज चोरीची प्रकरणे
बेकायदेशीर वीज वापर, वाढीव वीज भार आणि चुकीच्या वीज दराची ३३४, वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरीची २०२४ तर वीज मीटर मध्ये फ़ेरफ़ार आणि अन्य प्रकारच्या थेट वीजचोरीच्या १६९२ प्रकरणांचा समावेश आहे.