नागपुरात ४०० किलो गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 09:33 PM2018-09-17T21:33:16+5:302018-09-17T21:34:38+5:30

परप्रांतातून गांजाची मोठी खेप घेऊन येणाऱ्या आठ तस्करांना अटक करून त्यांच्याकडून ४०० किलो गांजा, पाच वाहनां(कार) सह ७२ लाखांचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला. अटक करण्यात आलेल्या गांजा तस्करांमध्ये पाच नागपूरचे तर तीन तस्कर अमरावतीचे आहेत.

400 kg of ganja seized in Nagpur | नागपुरात ४०० किलो गांजा जप्त

नागपुरात ४०० किलो गांजा जप्त

Next
ठळक मुद्देपाच कार, आठ आरोपी गजाआड : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परप्रांतातून गांजाची मोठी खेप घेऊन येणाऱ्या आठ तस्करांना अटक करून त्यांच्याकडून ४०० किलो गांजा, पाच वाहनां(कार) सह ७२ लाखांचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला. अटक करण्यात आलेल्या गांजा तस्करांमध्ये पाच नागपूरचे तर तीन तस्कर अमरावतीचे आहेत. रविवार आणि सोमवार असे सलग दोन दिवस पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केली. अलीकडच्या काही वर्षांतील ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते.
ओडिशा, झारखंड आणि आंध्र प्रदेशातून नागपुरात नियमित मोठ्या प्रमाणात गांजाची खेप येते. येथून ती वेगवेगळ्या प्रांतात ती पोहचविली जाते. कोट्यवधींच्या उलाढालीचा हा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षांपासून बिनबोभाट सुरू आहे. रविवारी दुपारी अशीच मोठी खेप नागपुरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून पोलिसांनी कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कापसी पुलाजवळ सापळा लावला. खबऱ्याने दिलेल्या नंबरची कार समोर दिसताच पोलिसांनी ती डस्टर आणि वार्ना अशा दोन कार थांबविल्या. या कारची झडती घेतली असता डस्टर कारमध्ये १६९ किलो २६४ ग्राम गांजा आणि गांजा तस्कर राजेंद्र ऊर्फ लड्डू किराड, (वय ३२, रा. सतनामीनगर, लकडगंज), नितीन कृष्णाजी मोहाडीकर (वय ३५, रा. भवानीनगर न्यू शारदा चौक, कळमना) बसून होते. सोबतच्या वार्ना कारमध्ये ५० किलो ४८० ग्राम गांजासह स्वप्निल सुरेश तोडसाम (वय ३०, रा. आराधनानगर खरबी), महेंद्र केशवराव वाडनकर (वय ३२, रा. सतनामीनगर, लकडगंज) आणि अनिल विष्णुप्रसाद विश्वकर्मा (वय १९, रा. भवानीनगर, कळमना) हे सापडले. त्यांच्याकडून हा गांजा, दोन्ही वाहने तसेच आठ मोबाईलसह ३९ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. हा गांजा अमरावतीला जाणार असल्याचे आणि आणखी मोठी खेप उद्या नागपुरात येणार असल्याची माहिती उपरोक्त गांजा तस्करांनी दिली. त्यावरून पोलिसांनी या कारवाईबाबत गोपनीयता बाळगून पुन्हा सोमवारच्या कारवाईची तयारी केली.
ठरल्याप्रमाणे पोलिसांनी आज पुन्हा विहीरगावजवळच्या मार्गावर आणि अमरावती मार्गावर सापळा लावला. पोलिसांना माहीत असलेल्या क्रमांकाची टाटा इंडिगो (एमएच २७/ एसी ७४५६), स्वीफ्ट डिझायर (एमएच २७/ २८७७) आणि फोर्ड कार (एमएच ०४/ डीवाय ३८८३) पोलिसांना येताना दिसली. पोलिसांचा ताफा समोर दिसताच आरोपी शेख सादिक शेख बाबा (वय ३३), शेख अरमान शेख उमर (वय २१) आणि शेख राजिक ऊर्फ गोलू शेख बाबा (वय २२) हे तिघे कारमधून उड्या घेऊन पळू लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना जेरबंद केले. हे तिघेही अमरावतीच्या आझादनगरातील गौसिया मशिदीजवळ राहतात. पोलिसांनी त्यांच्या कारमधून १८२ किलो गांजा (बाजारभावाप्रमाणे किंमत १८ लाख २४ हजार), मोबाईल आणि वाहन असा एकूण ३२ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही मिळून अशाप्रकारे गांजा आणि कारसह पोलिसांनी ७२ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

तडीपारीनंतर तस्करी
पोलिसांनी अटक केलेला आरोपी राजेंद्र ऊर्फ लड्डू किराड हा अनेक वर्षांपासून अमली पदार्थाची तस्करी तसेच गुन्हेगारीत सक्रिय आहे. त्याच्या गुन्हेगारीचा अहवाल बघता पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी त्याला नागपुरातून तडीपार केले होते. तडीपारीनंतर तो गांजा तस्करीत सक्रिय झाल्याचे आजच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त आयुक्त बी. जी. गायकर, गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम तसेच सहायक आयुक्त संजीव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीपीएस सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकम, सहायक निरीक्षक दिलीप चंदन, स्वप्निल वाघ, एएसआय अर्जुन सिंग, विठोबा काळे, हवालदार दत्ता बागुल, विनोद मेश्राम, नायक तुलसी शुक्ला, सतीश पाटील, शिपाई नितीन साळुंखे, नरेश शिंगणे, कुंदा जांभुळकर, रुबिना शेख त्याचप्रमाणे सायबर सेलचे सूरज भोंगाडे, सुहास शिंगणे, आशिष पाटील आणि नितीन वानखेडे आदींनी ही कामगिरी बजावली.

Web Title: 400 kg of ganja seized in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.