४० प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस
By Admin | Updated: July 5, 2014 02:16 IST2014-07-05T02:16:14+5:302014-07-05T02:16:14+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने मूल्यांकनाच्या कार्यात गैरहजर राहणाऱ्या किंवा ..

४० प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने मूल्यांकनाच्या कार्यात गैरहजर राहणाऱ्या किंवा हलगर्जीपणा करणाऱ्या प्राध्यापकांविरोधात कठोर भूमिका घेण्याचे ठरविले आहे. त्याअंतर्गतच शुक्रवारी ४० प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या. या प्राध्यापकांमुळे मूल्यांकनाची प्रक्रिया संथ झाली असून त्यांच्याविरुद्ध कारवाई का करू नये, असा प्रश्न विद्यापीठाकडून उपस्थित करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे हे सर्व प्राध्यापक अभियांत्रिकी शाखेचेच आहेत.
नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागासाठी मूल्यांकनाला होणारा उशीर ही नेहमीचीच डोकेदुखी आहे. विद्यापीठात मूल्यांकनासाठी दरवर्षी निरनिराळ्या महाविद्यालयांतील प्राध्यापकांची नेमणूक करण्यात येते. मूल्यांकनाची प्रक्रिया सुरळीतपणे चालावी आणि वेळेत पूर्ण व्हावी यासाठी सहकार्य करणे ही प्राध्यापकांची जबाबदारीच असते. विद्यापीठात तयार करण्यात आलेल्या ‘स्पॉट’ मूल्यांकन केंद्रांवर निर्धारित वेळापत्रकानुसार जाणे व मूल्यांकन करणे हे देखील प्राध्यापकांकडून अपेक्षित असते. परंतु प्रत्यक्षात मात्र अनेक प्राध्यापक हे मूल्यांकनासाठी एकतर येतच नाही किंवा अनियमितपणे येतात. त्यामुळे मूल्यांकनाच्या कामाला फटका बसतो व निकाल लावण्यास उशीर होतो.
यंदा परीक्षांच्या निकालाच्या गाडीने हवा तसा वेग घेतलेला नाही. हीच बाब लक्षात घेऊन परीक्षा नियंत्रकांनी मूल्यांकनाच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या प्राध्यापकांना मागील आठवड्यातच एका तातडीच्या अधिसूचनेद्वारे ‘अल्टिमेटम’ दिला होता. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या कलम ३२ (५) (ग)नुसार मूल्यांकन व परीक्षेसंदर्भातील कामात बेजबाबदारपणा, अकार्यक्षमता, हलगर्जीपणा दाखविणे हा गंभीर दु:व्यवहार मानण्यात येतो. आॅर्डनन्स क्रमांक १७ नुसार शिस्तीचा भंग करणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाईचा विद्यापीठाला अधिकार आहे. या अधिसूचनेला प्राध्यापकांनी गंभीरतेने घेतले नाही. त्यामुळे परीक्षा विभागातर्फे अभियांत्रिकी विद्याशाखेच्या ४० प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)