40% increase in covid policy over health insurance! | आरोग्य विम्यापेक्षा कोविड पॉलिसीच्या प्रमाणात ४० टक्के वाढ!

आरोग्य विम्यापेक्षा कोविड पॉलिसीच्या प्रमाणात ४० टक्के वाढ!

ठळक मुद्देकोविड रुग्ण घेताहेत योजनेचा लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : जिल्ह्यात कोरोना स्थिती गंभीर झाल्याने आणि मृत्यूदर वाढल्याने कोविड पॉलिसी काढण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे साधारण आरोग्य विम्यापेक्षा कोविड पॉलिसीचे प्रमाण जवळपास ४० टक्क्यांनी वाढले आहे. मात्र अशा विम्याचा लाभ प्रत्यक्ष रुग्णालयात घेण्याचे प्रमाण ३ टक्के असल्याची माहिती आहे.
खासगी रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नसल्याचे कारण सांगून साधारण आरोग्य विम्याचा अर्थात मेडिक्लेमचा फायदा रुग्णांना होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ठराविक कोविड पॉलिसी काढण्याकडे लोकांचा कल वाढल्याचे एजंटांनी सांगितले.

कोविड पॉलिसी ऑनलाईन आणि एजंटामार्फत काढण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्वसाधारण आरोग्य विमा योजनेपेक्षा कोविड विम्याचा हप्ता कमी असल्याने गेल्या महिनाभरात याचे प्रमाण जवळपास ४० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. ऑनलाईन विमा काढणाऱ्यांचा विचार केला तर हे प्रमाण आणखी जास्त असू शकते. विमा लागू होऊन त्याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना कमी वेळ मिळाल्याने प्रत्यक्ष रुग्णालयातील माहितीनुसार अशा कोविड विम्याचा लाभ घेण्याचे प्रमाण ३ टक्के असल्याचे समजते. पुढील काही महिन्यात यात वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक विमा कंपन्या कोविड पॉलिसी घेऊन स्पर्धेत उतरल्या आहेत.
एजंटांनी सांगितले, कोविड विमा काढण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. साडेनऊ महिन्यांसाठी ही पॉलिसी असून, हप्ता, वेटिंग काळ कमी असल्याने तो सहज घेता येतो. सध्या कोरोना काळात याची गरज वाढली आहे. सध्या सर्वसाधारण आरोग्य विम्यातच कोविडचा समावेश असलेल्या योजनेकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. कोरोना महामारीमुळे यात वाढ होताना दिसत आहे. लोक आरोग्याबाबत अधिक सतर्क झाल्याचे चित्र आहे.

कोविड विम्याकडे का वाढतोय कल :

- कोविड विम्याचा हप्ता हा नियमित आरोग्य विम्याच्या तुलनेत २२ ते २५ टक्के इतकाच आहे.
- कोविड विमा मंजुरीसाठी प्रतीक्षा काळ १५ दिवसांचा आहे. अन्य आरोग्य विम्यात तो ३० दिवसांचा असतो.

- कोविड विमा हा कॅशलेस नसला तरी त्याचा परतावा लगेच मिळतो.
- हा विमा कोणत्याही वयोगटातील व्यक्तीस काढता येतो.

- जुनाट आजार वगळता अन्य व्यक्तीसाठी तो सहजसुलभ आहे.

 

Web Title: 40% increase in covid policy over health insurance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.