ई-पॉस मशीनमुळे ३.६४ मेट्रिक टन धान्याची बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 20:26 IST2019-08-03T20:24:10+5:302019-08-03T20:26:30+5:30
सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत करण्यात येणारे धान्य वितरण हा सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. धान्य वितरण योग्य लाभार्थ्यांनाच व्हावी, यासाठी सर्व रास्त भाव दुकानांमध्ये ई-पॉस मशीन बसविण्यात आली आहे. या ई-पॉसमुळे लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून शिधावस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरणामुळे ३.६४ मेट्रिक टनाहून अधिक धान्याची बचत झाली आहे.

ई-पॉस मशीनमुळे ३.६४ मेट्रिक टन धान्याची बचत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत करण्यात येणारे धान्य वितरण हा सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. धान्य वितरण योग्य लाभार्थ्यांनाच व्हावी, यासाठी सर्व रास्त भाव दुकानांमध्ये ई-पॉस मशीन बसविण्यात आली आहे. या ई-पॉसमुळे लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून शिधावस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरणामुळे ३.६४ मेट्रिक टनाहून अधिक धान्याची बचत झाली आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्था गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यावर राज्य शासनाने भर दिला आहे. ई-पॉस मशीनद्वारे केरोसीनचे सुद्धा वाटप केले जात आहे. त्यामुळे सुमारे ६० टक्क्यांपर्यंत केरोसीनची बचत झाली आहे. दरमहा सव्वाकोटी कुटुंब आधार प्रमाणिकरण करून धान्य उचल करीत असल्यामुळे विक्री व्यवहार पारदर्शक झाले आहेत. या प्रणालीमुळे लाभार्थ्यांना राज्यातील कोणत्याही धान्य दुकानातून धान्य घेण्याची सुविधा पोर्टबिलिटीमुळे शक्य झाली आहे. ई-पॉस मशीनवरील विक्री व्यवहार mahafood.gov.in संकेतस्थळावर जनतेसाठी उपलब्ध असल्याने, विभागाच्या कामकाजात पारदर्शकता येण्यास मदत झाली असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.
ई-पॉसमुळे काळाबाजार रोखण्यास मदत होण्याबरोबरच रेशन दुकानदारांना उत्पन्नवाढीसाठी प्रोत्साहन मिळाले आहे. सर्व शिधापत्रिका या आधार कार्डशी जोडण्यात आल्यामुळे, पात्र लाभार्थ्यांंना नियमित धान्य मिळू लागले आहे. जून २०१७ पासून सर्व रास्त भाव दुकानांतून ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण केले जात असून, १ मे २०१८ पासून आधार प्रमाणिकरण करूनच धान्य वितरण केले जात असल्याचे यावेळी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी सांगितले.