361 Swine flu patients in Vidarbha: death toll rises to 39 | विदर्भात स्वाईन फ्लूचे ३६१ रुग्ण : मृत्यूचा आकडा गेला ३९ वर
विदर्भात स्वाईन फ्लूचे ३६१ रुग्ण : मृत्यूचा आकडा गेला ३९ वर

ठळक मुद्दे नागपूर जिल्ह्यात २४८ रुग्णांची नोंद

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : जानेवारी ते आतापर्यंत विदर्भात स्वाईन फ्लूचे ३६१ रुग्ण आढळून आले असून, मृत्यूचा आकडा ३९ वर गेला आहे. विशेष म्हणजे, सर्वाधिक रुग्णांची नोंद नागपूर जिल्ह्यात झाली आहे. रुग्णांची संख्या २४८ वर पोहचली आहे. सध्या ढगाळ वातावरण असल्याने लोकांना सतर्क राहण्याचे व सर्दी, घशात खवखव आणि ताप असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
बदलत्या वातावरणाचा परिणाम शरीरावर होऊ लागला आहे. सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. हीच लक्षणे स्वाईन फ्लूची आहेत. परंतु अनेक जण याला सुरुवातीलाच गंभीरतेने घेत नाही. जेव्हा आजाराची गुंतागुंत वाढते तेव्हाच रुग्ण डॉक्टरांकडे जातात. सध्या स्वाईन फ्लूचा जोर कमी असला तरी पाऊस लांबणार असल्याने सतर्क राहण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, १ जानेवारी ते २० ऑगस्ट २०१९ पर्यंत नागपूर शहरात २२४, ग्रामीणमध्ये २४, वर्धा जिल्ह्यात पाच, गोंदिया जिल्हात पाच, भंडारा जिल्ह्यात चार, गडचिरोली जिल्ह्यात तीन, चंद्रपूर जिल्ह्यात १०, अमरावती जिल्ह्यात ३०, अकोला जिल्ह्यात चार, यवतमाळ जिल्ह्यात तीन, बुलडाणा जिल्ह्यात एका रुग्णाची नोंद झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे, इतर राज्यातून नागपुरात उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या ४२ आहे. यात मध्य प्रदेशातील ४०, पश्चिम बंगालमधील एक व दिल्ली येथील एक रुग्ण आहे. जुलै महिन्यात एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. ऑगस्ट महिन्यात नागपुरात एका रुग्णाची नोंद झाली आहे. वातावरणातील बदलांमुळे स्वाईन फ्लू वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नागपूर जिल्ह्यात २५ मृत्यू
गेल्या आठ महिन्यात नागपूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूने २५ बळी घेतले आहे. यात नागपूर शहरातील २० तर ग्रामीण भागातील पाच आहेत. भंडारा जिल्ह्यात एक, चंद्रपूर जिल्ह्यात चार, अमरावती जिल्ह्यात सहा, यवतमाळ जिल्ह्यात एक, अकोल जिल्ह्यात एक, मुंबई जिल्ह्यात एक अशी एकूण ३९ मृत्यूची नोंद झाली आहे.


Web Title: 361 Swine flu patients in Vidarbha: death toll rises to 39
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.