३६ प्रकरणात फरार असलेल्या गुन्हेगारास फिल्मी स्टाईलने पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 23:05 IST2019-05-31T23:05:07+5:302019-05-31T23:05:43+5:30
बलात्कार, घरफोडी आणि अवैध शस्त्र ठेवणे आदी ३६ प्रकारच्या गंभीर प्रकरणात फरार असलेल्या गुन्हेगारास शांतिनगर पोलिसांनी फिल्मी स्टाईलने अटक केली. अजय ऊर्फ अज्जू शिवदयाल यादव (३४) रा. कोतवाली सिवनी मध्य प्रदेश असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र व मध्य प्रदेशात अनेक गुन्हे दाखल आहेत. तब्बल ३६ प्रकरणात तो फरार आहे. पोलिसांनी त्याच्याजवळून ३ लाख ६४ हजार रुपयाचा माल जप्त केला.

३६ प्रकरणात फरार असलेल्या गुन्हेगारास फिल्मी स्टाईलने पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बलात्कार, घरफोडी आणि अवैध शस्त्र ठेवणे आदी ३६ प्रकारच्या गंभीर प्रकरणात फरार असलेल्या गुन्हेगारास शांतिनगर पोलिसांनी फिल्मी स्टाईलने अटक केली. अजय ऊर्फ अज्जू शिवदयाल यादव (३४) रा. कोतवाली सिवनी मध्य प्रदेश असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र व मध्य प्रदेशात अनेक गुन्हे दाखल आहेत. तब्बल ३६ प्रकरणात तो फरार आहे. पोलिसांनी त्याच्याजवळून ३ लाख ६४ हजार रुपयाचा माल जप्त केला.
सहायक पोलीस आयुक्त वालचंद्र मुंढे यांनी पत्रपरिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, शांतिनगर पोलीस ठाणे हद्दीतील तेलीपुरा येथील रहिवासी डॉ. राजेश लक्ष्मीचंद्र जैन हे काही दिवसांपूर्वी भाचीच्या साक्षगंधासाठी कुटुंबासह जबलपूरला गेले होते. त्यादरम्यान त्यांच्या घरी चोरी झाली. चोरांनी २ लाख २३ हजार १०० रुपयाचे दागिने चोरून नेले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.बी. उईके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार घनश्याम तिवारी, अश्विन बोरकर, प्रकाश पखान, वसीम, विवेक कवाडकर यांनी या प्रकरणाचा तपास केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा शोध लागत नव्हता. तेव्हा पोलिसांनी वेश बदलून दिवस रात्र नजर ठेवली. गुरुवारी आरोपी सापडला. पोलिसांनी त्याला आवाज दिला. तेव्हा तो पळू लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अटक केली. त्याने जैन यांच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली. यासोबतच त्याने अनेक गुन्हे केल्याचेही कबूल केले. मध्य प्रदेशमध्येही त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. मध्य प्रदेश पोलिसांनी त्याला तडीपार करण्याची कारवाई केली होती. त्यामुळे तो नागपूरला पळून आला होता. तेव्हापासून तो नागपुरातच घरफोडी व चोरी करू लागला.