नागपूर : कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली असताना दैनंदिन बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी ३३५ बाधितांची नोंद झाली. तर, ५७६ रुग्ण बरे झाले आहेत. हा दर ९३.७० टक्क्यांवर पोहचला आहे. रुग्णांची एकूण संख्या १,२२,६४९ झाली असून मृतांची संख्या ३,९०७ वर गेली आहे.
नागपूर जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून ४ हजारांखाली कोरोना चाचण्या होत आहेत. आज २,२६७ आरटीपीसीआर तर १००५ रॅपिड अँटिजेन अशा एकूण ३,२७२ संशयित रुग्णांच्या चाचण्या झाल्या. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ३०४, ग्रामीणमधील २८ तर जिल्ह्याबाहेरील ३ रुग्ण आहेत. मृतांमध्ये आज शहरातील १, ग्रामीणमधील ३ तर जिल्ह्याबाहेरील ३ रुग्णांचे मृत्यू झाले. आतापर्यंत शहरात एकूण ९७,११६ रुग्ण व २,६२७ मृत्यू तर ग्रामीण भागात २४,७५७ रुग्ण व ६८६ मृत्यूची नोंद झाली आहे.
-क्षमतेपेक्षा कमी चाचण्या
रोज ३५० ते ४५० दरम्यान बाधितांची भर पडत असताना चाचण्यांची संख्या वाढत नसल्याचे दिसून येत आहे. शासकीय प्रयोगशाळेच्या क्षमतेच्या तुलनेत कमी चाचण्या होत आहेत. मेडिकलमध्ये आज २२६, एम्समध्ये १३७, मेयोमध्ये १४९, माफसूमध्ये ६१, नीरीमध्ये शून्य, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत २३८ तर खासगी लॅबमध्ये १,४५६ चाचण्या झाल्या. जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहचण्यासाठी व त्यांना उपचाराखाली आणण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-पुण्याला नमुने पाठविण्यासाठी मेडिकलचा पुढाकार
कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आलेल्या विदेशातून नागपुरात परतलेल्या प्रवाशांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. पहिल्या प्रवाशाचे नमुने मनपाने मेयोमार्फत पाठविले. परंतु यात दोन दिवसांचा वेळ गेला. आता मेडिकलनेही यात पुढाकार घेतला आहे. चार प्रवाशांचे नमुने मेडिकलने पुण्याच्या ‘एनआयव्ही’कडे पाठविले आहेत. यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
-दैनिक संशयित : ३,२७२
-बाधित रुग्ण : १,२२,६४९
_-बरे झालेले : १,१४,९२६
- उपचार घेत असलेले रुग्ण : ३,८१६
- मृत्यू : ३,९०७