नागपूर जिल्ह्यातील खुर्सापार सीमेवर ३३ किलो चांदीची भांडी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 09:34 PM2019-09-23T21:34:52+5:302019-09-23T21:36:14+5:30

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या खुर्सापार सीमेवर महसूल विभागाच्या पथकाने एका कारमधून ३३ किलो चांदीची भांडी जप्त केली. सोमवारी दुपारी ३.३० वाजता ही कारवाई करण्यात आली.

33 kg silverware seized at Khursapar border in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील खुर्सापार सीमेवर ३३ किलो चांदीची भांडी पकडली

नागपूर जिल्ह्यातील खुर्सापार सीमेवर ३३ किलो चांदीची भांडी पकडली

Next
ठळक मुद्देमहसूल पथकाची कारवाई : पडताळणी सुरू

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर (सावनेर) : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या खुर्सापार सीमेवर महसूल विभागाच्या पथकाने एका कारमधून ३३ किलो चांदीची भांडी जप्त केली. सोमवारी दुपारी ३.३० वाजता ही कारवाई करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर सावनेर विधानसभा क्षेत्रातील सीमावर्ती भागात महसूल विभागाचे निगराणी पथक तैनात करण्यात आले आहे. या पथकाने खुर्सापार नाक्यावर मध्य प्रदेशातून नागपूरच्या दिशेने येणाऱ्या मारुती कार क्रमांक एम.पी.०९/डब्ल्यू.सी.०१७१ ची तपासणी केली. यात गाडीत बसलेल्या दोघांजवळ तीन पिशव्यात चांदीची भांडी आढळून आली. यात चांदीचा प्याला, दिवा अशी पूजेची भांडी होती. या भांड्याची राजस्थान येथून खरेदी करण्यात आली आहे. इंदूर येथून ही भांडी नागपूर येथील बाजारात विक्रीला नेण्यात येत होती. नाकोडा ज्वेलर्स, इंदूरचा हा माल असल्याची माहिती त्या दोघांनी पथकातील अधिकाऱ्यांना दिली. पथकाने याप्रकरणी चिराग जैन याच्यासह त्याच्या सहकाऱ्याला ताब्यात घेतले. ही भांडी मिश्रित चांदीची असल्याची माहिती त्यांनी दिली. याचे बाजारभाव मूल्य ९ लाख ६० हजार रुपये असल्याचे सांगितले. सदर प्रकरणाची माहिती कळताच सावनेरचे तहसीलदार दीपक कारंडे, नायब तहसीलदार सतीश मासाळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या दोघांना चांदीच्या भांड्यासह तहसील कार्यालयात आणले. जप्त करण्यात आलेला माल सावनेर येथील कोषागारात जमा करण्यात आला असून, या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांना विचारणा केली असता सदर प्रकरणाची चौकशी सुरुअसल्याचे सांगितले.

Web Title: 33 kg silverware seized at Khursapar border in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.