राज्यात ३२ हजार मुले शाळाबाह्य : राज्य सरकारची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:54 IST2019-03-02T00:53:08+5:302019-03-02T00:54:24+5:30
राज्यामध्ये ६ ते १४ वर्षे वयोगटातील ३२ हजार ११ शाळाबाह्य मुले आढळून आली असून त्यापैकी ३ हजार ३७९ मुले कधीच शाळेत गेली नाहीत तर, २८ हजार ६३२ मुले शाळेत सतत गैरहजर राहतात. राज्य सरकारच्या उत्तरातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

राज्यात ३२ हजार मुले शाळाबाह्य : राज्य सरकारची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यामध्ये ६ ते १४ वर्षे वयोगटातील ३२ हजार ११ शाळाबाह्य मुले आढळून आली असून त्यापैकी ३ हजार ३७९ मुले कधीच शाळेत गेली नाहीत तर, २८ हजार ६३२ मुले शाळेत सतत गैरहजर राहतात. राज्य सरकारच्या उत्तरातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये यासंदर्भातील जनहित याचिकेचे कामकाज पाहणारे अॅड. फिरदोस मिर्झा यांच्या पत्राला पाठविलेल्या उत्तरात ही माहिती आहे. याशिवाय सरकारने, शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण व त्यांची आकडेवारी गोळा करण्यासाठी क्षेत्रनिहाय प्राधिकारी नियुक्त केल्याचे सांगितले आहे. त्यानुसार, महानगरपालिका क्षेत्राकरिता शिक्षणाधिकारी, नगर परिषद क्षेत्राकरिता प्रशासकीय अधिकारी तर, जिल्हा परिषद क्षेत्राकरिता प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यावर सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यासंदर्भात अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे.
देशात २०१० मध्ये शिक्षण हक्क कायदा लागू झाला. त्यानुसार राज्य शासनाने २०११ मध्ये नियम लागू केले. परंतु, नियमांचे काटेकोर पालन केले जात नाही. त्यामुळे राज्यात आजही मोठ्या संख्येत शाळाबाह्य मुले आहेत. यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये न्यायालयाने शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी विशेष अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश दिले होते. विशेष अधिकारी अधिसूचित झाल्यानंतर शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात यावे व सर्वेक्षणाचा अहवाल आल्यानंतर केंद्रीय व राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांच्याशी सल्लामसलत करून शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी धोरण तयार करावे असे आदेशही न्यायालयाने दिले होते व ती याचिका निकाली काढली होती. दरम्यान, अॅड. मिर्झा यांनी राज्य सरकारला पत्र लिहून न्यायालयाच्या आदेशांवर झालेल्या अंमलबजावणीची माहिती मागितली होती. त्यांना सरकारने उत्तर दिले आहे.
जिल्हानिहाय शाळाबाह्य मुले
अहमदनगर - ५२१
अकोला - ६८९
अमरावती - ३२६
औरंगाबाद - ४६४
बिड - २५०५
भंडारा - ४५
बुलडाणा - ४४२
चंद्रपूर - १५६
धुळे - १८१७
गडचिरोली - ५१
गोंदिया - ११४
हिंगोली - ७८४
जळगाव - १८६४
जालना - ७६८
कोल्हापूर - १०३
लातुर - ३२९
मुंबई उपनगर - ३८३
बृहंमुंबई - ३५५८
नागपूर - ३६
नांदेड - १६७
नंदुरबार - २७५४
नाशिक - २३०३
उस्मानाबाद - १६२
परभणी - ४४१
पालघर - २५००
पुणे - २३५९
रायगड - ४५३
रत्नागिरी - १०७
सांगली - १३९
सातारा - १५७
सिंधुदुर्ग - १२९
सोलापूर - ३१४
ठाणे - ४५४३
वर्धा - ४३
वाशीम - ७५
यवतमाळ - ४१०