उपराजधानीतील ३०० हॉस्पिटल धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:07 IST2021-04-11T04:07:25+5:302021-04-11T04:07:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उपराजधानीची मेडिकल हबच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. शहरात ६०० लहान-मोठे हॉस्पिटल आहेत. ...

उपराजधानीतील ३०० हॉस्पिटल धोकादायक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीची मेडिकल हबच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. शहरात ६०० लहान-मोठे हॉस्पिटल आहेत. रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हॉस्पिटलचे 'फायर सेफ्टी ऑडिट' तसेच विद्युत उपकरणांचे 'इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट' होणे महत्त्वाचे आहे. परंतु, यातील अर्ध्याहून अधिक हॉस्पिटलचे बांधकाम नियमानुसार नाही. आग नियंत्रणाची यंत्रणा असली तरी अग्निशमन विभागाच्या निकषात बसत नसल्याने आग लागल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
भंडारा जिल्हा रुग्णालयात जानेवारी महिन्यात शॉर्ट सर्कीटमुळे लागलेल्या आगीत नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. शुक्रवारी वाडी येथील वेल ट्रीट हॉस्पिटलला लागलेल्या आगीत चार रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनामुळे नागपूर शहरातील हॉस्पिटलच्या फायर सेफ्टी ऑडिटचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र फायर प्रीव्हेंशन अँड लाईफ सेफ्टी मेजर्स अॅक्ट २००६ च्या अनुषंगाने फायर सेफ्टी ऑडिटच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील सर्व हॉस्पिटलना नोटीस बजावून फायर सेफ्टी ऑडिट केल्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.
...
जुन्या इमारतीत हॉस्पिटल
नागपूर शहरातील धंतोली, रामदासपेठ व सदर भागात जुन्या इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल आहेत. निवासी बांधकामासाठी मंजुरी घेण्यात आली होती. आता अशा इमारतींमध्ये अनेक हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहेत. हॉस्पिटल सुरू करताना आग नियंत्रण यंत्रणा असली तरी नियमानुसार बांधकाम नसल्याने आगीसारखी दुर्घटना घडल्यास रुग्णांच्या जीविताला धोका आहे.
....
हे आवश्यक...
पाण्याची टाकी, पंप, हायड्रंट, स्प्रिंन्कलर, स्मोक अॅँड हीट डिटेक्टर या यंत्रणा असणे आवश्यक आहे. याशिवाय, संबंधित इमारतींना प्रमाणपत्रच दिले जात नाही. परंतु, अशी यंत्रणा अनेक हॉस्पिटलमध्ये नाही.
....
अशा आहेत त्रुटी
- काही हॉस्पिटलना ये-जा करण्यासाठी एकच मार्ग आहे.
-आग लागल्यास बाहेर पडण्यासाठी संकटकालीन मार्ग नाही.
- निवासी बांधकाम केलेल्या इमारतीत हॉस्पिटल असल्याने प्रशस्त जागा नाही.
-फायर सेफ्टी ऑडिटची प्रभावी अंमलबजावणी नाही.
-आयसीयू, एसएनसीयू, ऑक्सिजन युनिटचे वेळोवेळी इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट होत नाही.
...
वर्षातून दोनदा ऑडिट करणे बंधनकारक
जानेवारी व जुलै या दोन महिन्यांत शहरातील रुग्णालयांना स्वत:च फायर ऑडिट करून घ्यावे लागते. एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेकडून प्राप्त ‘ब’ प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे, अन्यथा अशा इमारती वा रुग्णालयांवर कारवाई करण्यात येते. शहरातील बहुतेक सर्व हॉस्पिटलचे ऑडिट करण्यात आले आहे. आवश्यक सूचना केल्या आहेत.
- राजेंद्र उचके, मुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा