३२ पैकी ३० पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:11 IST2021-01-16T04:11:24+5:302021-01-16T04:11:24+5:30
राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : रामटेक तालुक्याचा अर्धाअधिक भाग आदिवासीबहुल आहे. तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच ...

३२ पैकी ३० पदे रिक्त
राहुल पेटकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : रामटेक तालुक्याचा अर्धाअधिक भाग आदिवासीबहुल आहे. तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांच्यासाठी असलेल्या विविध याेजनांच्या याेग्य अंमलबजावणीसाठी शीतलवाडी (ता. रामटेक) येथे आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. या कार्यालयात मंजूर असलेल्या ३२ पैकी ३० विविध पदे कित्येक वर्षांपासून रिक्त आहेत. केवळ दाेन कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरू असलेल्या या कार्यालयाचा उपयाेग काय, असा प्रश्न आदिवासी बांधवांनी उपस्थित केला आहे.
हे कार्यालय महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या अखत्यारित आहे. याला उपप्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयाचा दर्जा देण्यात आला आहे. संपूर्ण कामकाज व्यवस्थित चालविण्यासाठी या कार्यालयात एकूण ३२ विविध पदांना शासनाने मंजुरी दिली. मात्र, काही वर्षांपासून येथील रिक्त पदे भरण्याकडे शासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे या कार्यालयातील रक्त पदांची संख्या सध्या ३० वर पाेहाेचली असून, सन २०१८ पासून ज्युनियर असिस्टंट उपप्रादेशिक व्यवस्थापकांचा प्रभार तसेच कार्यालयाचा कारभार सांभाळत आहेत.
सध्या या कार्यालयात ३२ पैकी कनिष्ठ सहायक रवींद्र उईके यांच्यासह अन्य एक कर्मचारी कार्यरत आहे. त्यांनाच व्यवस्थापकांपासून तर सहायकांपर्यतची सर्व कामे पाहावी लागतात. हे कार्यालय शीतलवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीतील परसाेड येथील एका छाेट्याशा खाेली थाटण्यात आले असून, ती खाेलीदेखील किरायाची आहे. कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे या कार्यालयात फारसे कामकाज हाेत नाही. विशेष म्हणजे, शासनाने या कार्यालयाच्या निर्मितीपासून आजवर या कार्यालयात पूर्णवेळ व्यवस्थापकांची नियुक्त केली नाही.
....
चालक व इंधनाची वानवा
या कार्यालयाला शासनाने वाहन दिले आहे. परंतु, ते वाहन चालविण्यासाठी पूर्णवेळ वाहनचालकाचे पद रिक्त असून, वाहनात टाकायला आवश्यक असलेल्या इंधनाच्या (डिझेल) खरेदीसाठी शासनाने निधीची तरतूद केली असली तरी निधी मात्र, कधीच दिला नाही. वाहन चालकासाेबतच ज्युनियर असिस्टंट, ग्रेडर, मार्केटिंग इन्स्पेक्टर, टायपिस्ट, अकाऊंटंट व चपराशी ही पदेही रिक्त आहेत. महत्त्वाची पदे वर्षानुवर्षे रिक्त असल्याने आदिवासी बांधवांसाठी असलेल्या शासकीय याेजनांची अंलबजावणी याेग्य रीतीने हाेत नसल्याचेही दिसून येते.
....
दैनंदिन कर्मचाऱ्यांची नियुक्ती
कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे या कार्यालयात दाेन दैनंदिन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना वाहनचालक, चाैकीदार व विपणन सहायक असा दर्जा दिला आहे. तालुक्यात दरवर्षी आदिवासी विकास महामंडळामार्फत धान खरेदी केली जाते. त्या खरेदी केंद्राच्या कारभाराकडे लक्ष देण्यास पुरेसे कर्मचारी या कार्यालयाकडे नाहीत. मागील वर्षी हिवराबाजार येथे खुले धान खरेदी केंद्र सुरू केले हाेते. पाऊस व रानडुकरांचा वावर यामुळे खरेदी केंद्रातील धान खराब झाला. हा प्रकार दरवर्षी सुरू असल्याने आदिवासी बांधवांच्या कल्याणकारी याेजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.