महादुल्यात ३० तर घाेटी केंद्रावर ३५ रुपये हमाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:09 IST2021-02-09T04:09:56+5:302021-02-09T04:09:56+5:30
राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : राज्य शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने रामटेक तालुक्यात पाच तर पणन महासंघाच्या ...

महादुल्यात ३० तर घाेटी केंद्रावर ३५ रुपये हमाली
राहुल पेटकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : राज्य शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने रामटेक तालुक्यात पाच तर पणन महासंघाच्या वतीने एक आणि जिल्ह्यात चार धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळ व पणन महासंघाच्या धान खरेदी केंद्रावर हमाली शासनाकडून घेण्याऐवजी शेतकऱ्यांकडून वसूल केली जात आहे. वेगवेगळ्या खरेदी केंद्रावर हमालीचे वेगवेगळे दर असल्याचे निदर्शनास आले आहेत. तालुक्यातील भंडारबाेडी-महादुला येथील धान खरेदी केंद्रावर प्रति क्विंटल ३० रुपये तर घाेटी केंद्रावर प्रति क्विंटल ३५ रुपये हमाली घेतली जात असल्याची माहिती धान उत्पादकांनी दिली. ही आर्थिक लूट असून, ती बंद करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.
आदिवासी विकास महामंडळाने रामटेक तालुक्यात महादुला-भंडारबाेडी, टुयापार-बेलदा, बांद्रा, पवनी व हिवराबाजार या पाच ठिकाणी तर पणन महासंघाने घाेटी (ता. रामटेक), अराेली (ता. माैदा), गुमथळा (ता. कामठी) यासह अन्य एका ठिकाणी शासकीय धान खरेदी केंद्र सुरू केले असून, या केंद्रांवर किमान आधारभूत किमतीनुसार धानाची खरेदी केली जात आहे. शिवाय, शेतकऱ्यांना पहिल्या ५० क्विंटल धानाला प्रति क्विंटल ७०० रुपयाचा बाेनस दिला जाणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे.
या खरेदी केंद्रावर हमाली ही शेतकऱ्यांकडून वसूल केली जात आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या महादुला-भंडारबाेडी येथील धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून प्रति क्विंटल ३० रुपये तर पणन महासंघाच्या घाेटी केंद्रावर प्रति क्विंटल ३५ रुपये हमाली वसूल केली जात आहे. महादुला-भंडारबाेडी येथील केंद्रावर आपण प्रति क्विंटल ३० रुपये हमाली दिल्याची माहिती महादुला येथील नारायण झाडे, धनराज झाडे, साेमा डडुरे, जितू महादुले यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी दिली.
घाेटी येथील खरेदी केंद्रावर प्रति क्विंटल ३५ रुपये हमाली घेण्यात आल्याची माहिती तेथील काही शेतकऱ्यांनी दिली. या प्रकारावर काही शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला. मात्र, अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही, असा आराेपही धान विक्रेत्या शेतकऱ्यांनी केला आहे. खरेदी केंद्रावरील सूचना फलकावर काेणत्याही सूचना व दर लिहिले नाही. त्यामुळे दिशाभूल हाेत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
....
शासकीय दर १२ रुपये प्रति क्विंटल
शासनाने हमालीचे दर प्रति क्विंटल १२ रुपये ठरवून दिले आहेत. शासन ही रक्कम आदिवासी विकास महामंडळामार्फत संबंधित साेसायटीला देते. त्यामुळे संबंधित साेसायटी व त्यांच्या माध्यमातून ती रक्कम हमालांना मिळणार आहे. शेतकऱ्यांकडून हमालीची रक्कम घेऊ नये, असेही शासनाने स्पष्ट केले आहे. हमालांनी शेतकऱ्यांकडून प्रति क्विंटल ३० ते ३५ रुपये घेतले असून, त्यांना शासनाकडून १२ रुपये मिळणार आहे. त्यामुळे या हमालीचा दर प्रति क्विंटल ४२ ते ४७ रुपयांवर केला आहे. आपल्याकडून वसूल केलेली हमाली आपल्या बँक खात्यात जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
...
माेजमापातही घाेळ
प्रत्येक पाेत्यात ४० किलाे धान माेजले जातात. बारदान्याचे वजन ५८० ग्रॅम असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे धानाचे माेजमाप करताना त्या पाेत्याचे एकूण वजन ४०.५८० किलाे असायला हवे. वास्तवात, त्या पाेत्याचे धानासकट वजन ४१ किलाे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून ४२० ग्रॅम धान प्रत्येक पाेत्यामागे अतिरिक्त घेतले जात आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. या केंद्रावर धानाची प्रति क्विंटल १,८६८ रुपये या किमान आधारभूत किमतीनुसार खरेदी केली जात असून, ७०० रुपये प्रति क्विंटल अतिरिक्त बाेनस मिळणार असल्याने शेतकरी याला प्राधान्य देत आहेत.