विमानतळावर दिल्लीवरून आलेले ३ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:12 IST2020-11-28T04:12:27+5:302020-11-28T04:12:27+5:30
रेल्वेस्थानकावर १२७० प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग नागपूर : कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता चार राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग विमानतळ आणि ...

विमानतळावर दिल्लीवरून आलेले ३ पॉझिटिव्ह
रेल्वेस्थानकावर १२७० प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग
नागपूर : कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता चार राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग विमानतळ आणि रेल्वेस्थानकावर सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३ प्रवासी पॉझिटिव्ह निघाले. तर रेल्वेस्थानकावर एकही प्रवासी पॉझिटिव्ह नसल्याची माहिती आहे. महापालिकेने या बाबीची पुष्टी केली आहे.
महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार जयपूरवरून १ आणि दिल्लीवरून ४ विमाने २६ नोव्हेंबरला नागपूर विमानतळावर पोहोचली. जयपूरवरून चार्टर विमानाने ६१ प्रवासी आले. त्यांनी पूर्वीच कोरोनाची टेस्ट केली होती. दिल्लीच्या चार विमानांनी आलेल्या ४६१ प्रवाशांपैकी ८१ प्रवाशांनी कोरोनाची टेस्ट केली. यातील ३ प्रवाशांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तीनही प्रवासी नागपूरच्या बाहेरील आहेत. संबंधितांना कठोरपणे नियमांचे पालन करण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत. विमानतळ तसेच रेल्वेस्थानकावर दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा येथून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. रेल्वेस्थानकावर ८ रेल्वेगाड्यांनी १२७० प्रवासी आले. त्यांची स्क्रिनिंग करण्यात आली. नवी दिल्ली-हैदराबादवरून आलेल्या १६२, पोरबंदर-हावडावरून आलेल्या १५२, निजामुद्दीन-बंगळुरुच्या ८९, अहमदाबाद-पुरीच्या १६७, नवी दिल्ली-विशाखापट्टनमच्या ३०८, नवी दिल्ली-चेन्नईच्या १३५ आणि अहमदाबाद-हावडा या गाडीतील ९१ प्रवाशांची स्क्रिनिंग करण्यात आली. महापालिकेच्या वतीने थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
..................