नागपूर विमानतळावरून आता २८ विमानांचे ‘टेक ऑफ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2021 19:57 IST2021-10-12T19:55:46+5:302021-10-12T19:57:23+5:30
Nagpur News सध्या नागपूर विमानतळावरून दररोज २२ विमानांचे आगमन आणि २२ विमानांचे उड्डाण होत आहे. ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत २८-२८ विमानांचे आगमन आणि उड्डाण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

नागपूर विमानतळावरून आता २८ विमानांचे ‘टेक ऑफ’
नागपूर : कोरोना लॉकडाऊनमध्ये प्रवासी क्षमतेवर निर्बंध आणल्यानंतर, घरगुती विमान प्रवाशांच्या संख्येत घसरण झाली होती, पण सरकारने १८ ऑक्टोबरपासून प्रवासी क्षमतेवरील निर्बंध हटविण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विमान कंपन्यांना दिलासा मिळाला असून, भविष्यात याचे सकारात्मक परिणाम डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिसून येणार आहे. सध्या नागपूर विमानतळावरून दररोज २२ विमानांचे आगमन आणि २२ विमानांचे उड्डाण होत आहे. ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत २८-२८ विमानांचे आगमन आणि उड्डाण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (28 planes take off from Nagpur airport)
सरकारच्या या निर्णयानंतर आता विमान कंपन्या नवीन शेड्युल तयार करीत असून, नवीन उड्डाणांसाठी वाहतुकीचे विश्लेषण करीत आहेत. विमान कंपन्यांसाठी हिवाळी सिझन व्यवसायासाठी सकारात्मक असतो. सणांसोबत पर्यटनासाठी प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याशिवाय कार्यरत लोक आणि व्यावसायिक प्रवाशांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे.
ही उड्डाणे होऊ शकतात नियमित
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गोवा, चेन्नई, कोलकाता आणि अलाहाबादची नियमित उड्डाणे नाहीत. या मार्गावर जास्त विमानांचे उड्डाणही होत नाहीत. नागपुरातून सर्वाधिक विमान सेवांचे संचालन करणारी इंडिगो एअरलाइन्स या उड्डाणांसह जयपूरकरिता उड्डाण सुरू करू शकते. कंपनीने पूर्वीही जयपूरकरिता तयारी केली होती, पण कोरोनामुळे ही सेवा सुरू होऊ शकली नाही, तर एअर इंडिया १८ ऑक्टोबरला नवीन शेड्युलसह सध्याच्या मार्गावर एक विमानसेवा पुन्हा वाढवू शकते, असे सूत्रांनी सांगितले.
प्रवाशांसाठी वाढणार पर्याय
सरकारच्या निर्णयामुळे प्रवाशांसाठी विमानसेवेचे पर्याय वाढणार आहेत. नवीन विमाने सुरू करण्यासंदर्भात विमान कंपन्याच निर्णय घेतील. भविष्याच्या तयारीसाठी मिहान इंडिया लिमिटेडने नागपूर विमानतळावर प्रवासी लाउंज परिसर वाढविण्याच्या तयारीला पूर्वीच सुरुवात केली होती. आता ते कामही पूर्ण झाले आहे. यामुळे प्रवाशांना टर्मिनल बिल्डिंगमध्ये ये-जा दरम्यान सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्य होईल.
- आबीद रूही, वरिष्ठ विमानतळ संचालक, मिहान इंडिया लिमिटेड.