कोच्छी, खिंडसीसाठी २६० कोटी
By Admin | Updated: May 5, 2016 03:00 IST2016-05-05T03:00:50+5:302016-05-05T03:00:50+5:30
सावनेर तालुक्यातील कोच्छी प्रकल्पासाठी १०० तर खिंडसीच्या पूरक कालव्यासाठी १६० कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, ...

कोच्छी, खिंडसीसाठी २६० कोटी
जलसंपदा मंत्र्यांची घोषणा : पालकमंत्र्यांसह केला संयुक्त पाहणी दौरा
सावनेर/रामटेक : सावनेर तालुक्यातील कोच्छी प्रकल्पासाठी १०० तर खिंडसीच्या पूरक कालव्यासाठी १६० कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली. राज्यातील कोणत्याच प्रकल्पाचे काम निधीअभावी थांबणार नाही, असे त्यांनी सांगत नागरिकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येईल, असे सांगितले.
कोच्छी बॅरेज प्रकल्प व खिंडसी प्रकल्पाची बुधवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संयुक्त पाहणी केली. अनेक प्रकल्पाचे काम निधीच्या कमतरतेमुळे रखडले आहे. २६२ कोटींचा कोच्छी प्रकल्प ७०० कोटींचा झाला आहे.
या प्रकल्पासाठी आणखी ३०० कोटींचाी आवश्यकता आहे. पुनर्वसन आणि रखडलेली कामे सुरू होण्यासाठी १०० कोटी रुपये जुलैमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. निधीअभावी अशाप्रकारे राज्यातील कोणत्याच प्रकल्पाचे काम थांबणार नाही, असे जलसंपदा मंत्र्यांनी स्पष्ट केले. कोच्छी बॅरेज या प्रकल्पाला मध्य प्रदेश शासनाने सहकार्य मिळाल्याचे सांगत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी १६० कोटी रुपये या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे उपलब्ध झाले. गोसीखुर्द, पेंच, कोच्छी हे सर्व प्रकल्प आता पूर्ण होणार आहे. तसेच या प्रकल्पात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण लवकरच आपण बैठक घेऊ, असे त्यांनी सांगितले.
या प्रकल्पाला २००७ मध्ये २६२ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली. प्रकल्पांतर्गत कोच्छी गावाजवळ कन्हान नदीवर २८५.५० मीटर लांबीचा काँक्रीट बॅरेज व डाव्या काठावर २०१२ मीटर लांबीचे मातीधरण बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या पूरक कालव्याची लांबी १३.४४ मीटर असून पेंच प्रकल्पाच्या उजव्या मुख्य कालव्यास पूरक कालवा जोडण्यात येईल. या धरणात ५४.१९ दलघमी पाणीसाठी होईल. यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खिंडसी प्रकल्पाची पाहणी करीत पेंच प्रकल्पाचा एक भाग असलेल्या खिंडसी पूरक कालव्यासाठी जलसंपदा मंत्र्यांनी १६० कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली. खिंडसी हा ब्रिटिशकालीन जलाशय असून या प्रकल्पाची साठवण क्षमता १०५.३१० दलघमी आहे. पेंचचा डावा कालवा खिंडसीला मिळतो. अडचणीच्या वेळी नवेगाव खैरी धरणावर ताण पडला की खिंडसीतील पाणी सोडले जाते. नवेगाव प्रकल्पातील अतिरिक्त पाणी ६३ दलघमी पाणी खिंडसीत सोडले जाते. खिंडसी पूरक कालव्यासाठी सिंचन महामंडळाची ९३९.२२ कोटींची प्रशासकीय मान्यता आहे. खिंडसी पूरक कालव्यासाठी त्यात २०७ कोटींची तरतूद आहे. खिंडसीमुळे २७९३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. मार्चपर्यंत प्रकल्पावर २०६ कोटी खर्च झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)
कोराडी - पेंच कालव्याची पाहणी
कोच्छी, खिंडसी प्रकल्प पाहणी दौऱ्यादरम्यान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जलसंपदा मंत्र्यांना महादुला येथील मोठ्या नहराची स्थिती दाखवली. या नहरात पाणी वाढल्याने महादुला गावात मागील वर्षी पाणी शिरले होते. या नहरासाठी असलेला निधी कमी पडतो. त्यात आणखी दोन कोटींनी वाढ करण्याची मागणीही बावनकुळे यांनी केली. त्यानंतर पेंचच्या उजव्या कालव्याची पाहणी करण्यात आली. या कालव्याच्या दुरुस्तीसाठी निधीची गरज असल्याचे जलसंपदा मंत्र्यांना सांगण्यात आले. या कालव्यावर त्यावेळी करण्यात आलेला २५० कोटींचा खर्च वसूल झाला. सद्यस्थितीत डाव्या कालव्यास आतून तडे गेले आहेत. कालव्याच्या आतील सिमेंटच्या भिंतीना भेगा पडल्या असल्याने बऱ्याच प्रमाणात पाणी जमिनीत मुरते. यासाठी कालव्याची दुरुस्ती होणे गरजेचे असल्याचे यावेळी जलसंपदा मंत्र्यांच्या लक्षात आणून देण्यात आले.