२६ कोटींचा सिगारेटचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2016 05:13 IST2016-04-05T05:13:22+5:302016-04-05T05:13:22+5:30
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न विभागाने ‘कोटपा’ कायद्यांतर्गत दोन नामांकित कंपन्यांच्या गोडाऊनवर धाड

२६ कोटींचा सिगारेटचा साठा जप्त
नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न विभागाने ‘कोटपा’ कायद्यांतर्गत दोन नामांकित कंपन्यांच्या गोडाऊनवर धाड टाकून २६ कोटी ७१ लाख ८ हजार रुपये किमतीचा सिगारेटचा साठा जप्त केला. नागपूर विभागात विभागाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. ही कारवाई संपूर्ण राज्यात सुरू आहे.
आयटीसी आणि गाडफ्रे फिलिप्स इंडियाचे गोडाऊन सील
केंद्र सरकारच्या ‘कोटपा’ कायद्यातील वैधानिक तरतुदींचा भंग केल्याच्या कारणावरून नागपूर विभागाने आयटीसी लिमिटेड आणि गाडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड या दोन नामांकित सिगारेट कंपन्यांच्या गोडाऊनवर सोमवारी धाड टाकली. आयटीसी कंपनीच्या कळमेश्वर तालुक्यातील मौजा निमजी येथील लॉजिस्टिक पार्कमधील गोडाऊनमधून २२ कोटी ८५ लाख ५७ हजार ६५८ रुपये किमतीची सिगारेट जप्त केली. यात मुख्यत्वे ब्रिस्टॉल, विल्स, गोल्ड फ्लॅग, क्लासिक आदींसह ४० ब्रॅण्डच्या सिगारेटचा समावेश आहे.
तर गाडफ्रे फिलिप्स इंडियाच्या वाडी येथील रेनबो एन्टरप्राईजेसवर धाड टाकून ३ कोटी ८५ लाख ४९ हजार २८१ रुपये किमतीची सिगारेट जप्त केली. त्यात मुख्यत्वे मालब्रो, फोर स्क्वेअर आदींसह २२ ब्रॅण्ड सिगारेटचा समावेश आहे.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे मुंबईचे सहआयुक्त (दक्षता) हरीश बैजल यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर विभागाचे सहआयुक्त (अन्न) शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) न.रं. वाकोडे आणि एम.सी. पवार यांच्या नियंत्रणाखाली अन्न सुरक्षा अधिकारी किरण गेडाम, अभय देशपांडे, ललित सोयाम, आनंद महाजन, अखिलेश राऊत, प्रवीण उमप, अमित उपलप यांनी केली.