-जागतिक मुख शल्य चिकित्सा दिन
सुमेध वाघमारे
नागपूर : जबड्यांच्या विसंगती व दोषांमुळे चेहरा विद्रूप दिसतो. समाजात वावरताना आत्मविश्वास ढासळतो. न्यूनगंडामुळे प्रगतीत बाधा येते. पोषणासोबतच बोलण्यातही अडचण निर्माण होते. या व्यंगावर गेल्या पाच वर्षांपासून यशस्वी शस्रक्रिया करून रुग्णांना नवीन जीवन देण्याचे कार्य शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय करीत आहे. विशेष म्हणजे, राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये केवळ नागपूरचा शासकीय दंत रुग्णालयातच ही ‘ऑर्थाेग्नॅथिक’ शस्रक्रिया होत आहे. आतापर्यंत जवळपास २५० रुग्णांवर ही यशस्वी शस्रक्रिया झाली असून, त्यांना नवीन चेहरा ‘लूक’ मिळाल्याने त्यांचे जीवन सुसह्य झाले आहे.
मुख शल्य चिकित्सा विभागाच्या पुढाकाराने ‘ऑर्थाेग्नॅथिक’ शस्रक्रियेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मंगेश फडनाईक यांच्या मार्गदर्शनात मुख शल्य चिकित्सा विभागाचे डॉ. अभय दातारकर यांच्या विशेष प्रयत्नामुळे अनेक रुग्णांना नवा चेहरा मिळत आहे. याबाबत अधिक माहिती देताना, डॉ. दातारकर म्हणाले, जबड्यातील दोष हे जन्मजात किंवा अपघातामुळे आलेले असतात. आपल्या जबड्याची सामान्य वाढ होत असताना पौंगडावस्थेत जबड्याची वाढ अचानक थांबते किंवा ती पूर्ण होत नाही. यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्यात विसंगती निर्माण होते. वरच्या किंवा खालच्या किंवा दोन्ही जबड्यात ही विसंगती राहू शकते, त्यांच्या आकारात असमानता येऊ शकते. यामुळे काही लोक पूर्णपूणे तोंड उघडू शकत नाही. अशा लोकांमध्ये अन्न चावून खाणे अडचणीचे ठरते. दोन्ही कानाजवळ दीर्घकाळ वेदना होऊ शकतात. जबड्यांचे हे दोष दूर करण्यासाठी ‘ऑर्थाेग्नॅथिक’ नावाची शस्रक्रिया महत्त्वाची ठरते.
- देशात केवळ १५ केंद्र!
संपूर्ण देशात या शस्रक्रियेची केवळ १५ ते १८ केंद्र आहेत. आतापर्यंत ही शस्रक्रिया मुंबई, पुण्यालाच व्हायची. रुग्णाला शस्रक्रियेसाठी ४ ते ५ लाखांचा खर्च यायचा. परंतु, आता नागपूरच्या दंत रुग्णालयात केवळ २२०० रुपयांमध्ये ही शस्रक्रिया केली जाते. शस्रक्रिया तोंडाच्या आतून चिरा देऊन केली जाते. त्यामुळे चेहऱ्यावर डाग पडत नाहीत. शस्रक्रियेसाठी साधारणत: २ ते ३ तास लागतात व दात ‘सेटअप’ व्हायला दोन वर्ष लागतात. त्यानंतर मृत्यूपर्यंत जबड्याला काहीच होत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
-चेहऱ्यावरील विकृती दूर होते ()
‘ओर्थोग्नाथिक सर्जरी’ म्हणजे जबडा सरळ करणे असा होतो. या शस्रक्रियेतून हनुवटीची विकृतीमुळे झालेला अरुंद चेहरा, चेहऱ्याच्या आकाराचे दोष, लहान-मोठे जबडे, घोरण्याची समस्या, जबड्यांमधील विसंगती दूर करता येते. आर्थाेडॉन्टिस्टच्या साहाय्याने ओरल आणि मॅक्सिलोफेशिअल सर्जनद्वारा ही ‘ऑर्थाेग्नॅथिक सर्जरी’ केली जाते.
-डॉ. अभय दातारकर
मुख शल्य चिकित्सा विभाग, शासकीय दंत महाविद्यालय
-विदर्भासह इतर राज्यातील रुग्णांनाही लाभ ()
‘ऑर्थाेग्नॅथिक’ या शस्रक्रियेसाठी विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगढ, ओरिसा व बिहार आदी राज्यातून रुग्ण येतात. दुभंगलेले ओठ, टाळू, डोके व चेहऱ्याच्या हाडाच्या विकृती यासारख्या जन्मजात विकृतीच्या सुधारणेसाठीही ही शस्रक्रिया महत्त्वाची ठरते.
-डॉ. मंगेश फडनाईक
अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय