चार स्टॉलवर सुविधा : विभागात पाच रेल्वे स्थानकावर अंमलबजावणी नागपूर : रेल्वेचे स्टॉल्स दुपारी ४ वाजता बंद होत असल्यामुळे बालकांच्या शिशू आहाराचा प्रश्न गंभीर झाला होता. परंतु रेल्वे प्रशासनाने त्यावर महत्त्वाचा निर्णय घेऊन दुपारी ४ नंतर ४ स्टॉल्सवरून शिशू आहार उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे प्रवाशांचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे. रेल्वेत अनेक जण आपल्या चिमुकल्यांसह प्रवास करतात. प्रवासात त्यांना आपल्या बाळाला गरम दूध, भोजन कसे द्यायचे, असा प्रश्न पडतो. त्यामुळे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या पुढाकाराने नागपूर विभागात नागपूरसह बैतूल, आमला, वर्धा, बल्लारशा रेल्वे स्थानकावर शिशू आहाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात पॉकेटचे दूध, पाणी आदींचा समावेश आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर एकूण आठ प्लॅटफार्म आहेत. प्लॅटफार्म क्रमांक एकवर १, २/३ वर दोन, प्लॅटफार्म क्रमांक ४/५ वर दोन, प्लॅटफार्म क्रमांक ६, ७ आणि आठव्या होम प्लॅटफार्मवर प्रत्येकी एक स्टॉल आहे. या ठिकाणी शिशू आहार उपलब्ध करून देण्याच्या सूचना देऊनही हे स्टॉल्स दुपारी ४ नंतर बंद होत असल्यामुळे शिशू आहाराचा प्रश्न गंभीर झाला होता. याची गंभीर दखल घेत रेल्वे प्रशासनाने जनाहार शेजारील स्टॉल रात्री १० ते सकाळी ६ दरम्यान सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय प्लॅटफार्म क्रमांक २ वरील रेल्वे स्टॉल, नैवेद्यम् तसेच सुनील कॅटरर्सचा स्टॉल रात्री सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय अवैध व्हेंडरला आळा घालण्यासाठी रेल्वे स्थानकावरील इतर सर्व खासगी हॉटेल सुरू करण्यात येणार आहेत.(प्रतिनिधी)
रेल्वे स्थानकात आता २४ तास शिशुआहार
By admin | Updated: July 21, 2016 02:07 IST