‘मंगळ महोत्सव’ विज्ञान प्रदर्शन २३पासून
By Admin | Updated: September 22, 2014 00:55 IST2014-09-22T00:55:37+5:302014-09-22T00:55:37+5:30
भारताने ५ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रक्षेपित केलेले ‘मंगळयान’ ७० कोटी कि़मी. प्रवास करून २४ सप्टेंबर रोजी मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करीत आहे. हा क्षण भारतीयांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा आहे.

‘मंगळ महोत्सव’ विज्ञान प्रदर्शन २३पासून
नागपूर : भारताने ५ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रक्षेपित केलेले ‘मंगळयान’ ७० कोटी कि़मी. प्रवास करून २४ सप्टेंबर रोजी मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करीत आहे. हा क्षण भारतीयांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा आहे. ही उपलब्धी असोसिएशन फॉर रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मंगळ महोत्सव’ या भव्य विज्ञान प्रदर्शनाच्या स्वरूपात साजरी करीत आहे.
या प्रदर्शनात सौरमंडळ, मंगळ ग्रह, भारतीय व वैश्विक अंतरिक्ष मिशन्स्चा इतिहास इत्यादींचा मागोवा घेण्यात येणार आहे. असोसिएशनचे सचिव सुरेश अग्रवाल यांनी सांगितले की, प्रदर्शनाचे आयोजन उत्तर अंबाझरी मार्गावरील राष्ट्रभाषा भवनात २३ ते २६ सप्टेंबरपर्यंत दुपारी १ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत होणार आहे. शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सौरमंडळाचे जवळून निरीक्षण करण्याची संधी आहे. प्रदर्शनात पीएसएलव्ही व मंगळ यानाचे मॉडेल, २०० सचित्र व सहज समजता येतील असे पोस्टर्स, सौर मंडळाचे २५ मॉडेल्स, विशेषज्ञांशी चर्चा आणि सायंकाळी ७ नंतर टेलिस्कोपद्वारे आकाशाचे निरीक्षण करण्याची संधी आहे.
असोसिएशन नागपुरात १९९८ पासून दरवर्षी पाच दिवसीय अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करते.
चर्चेदरम्यान असोसिएशनचे धनंजय रावल (अहमदाबाद), रामचंद्र लेले (कोल्हापूर), दिनेश ढोबळे, राजेश्वर लाटा, प्रकाश गावंडे, राजाभाऊ कुळकर्णी आणि एकनाथ सोनारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)