२३ वर्षीय ‘सृष्टी’ची पॉझिटिव्ह ‘दृष्टी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:07 IST2021-05-23T04:07:52+5:302021-05-23T04:07:52+5:30
भिवापूर : कोरोनामुळे चालती बोलती अनेक माणसं कायमची निघून गेली. त्यामुळे संसर्गाची भीती येथे प्रत्येकाला आहे. अशा भयग्रस्त परिस्थितीत ...

२३ वर्षीय ‘सृष्टी’ची पॉझिटिव्ह ‘दृष्टी’
भिवापूर : कोरोनामुळे चालती बोलती अनेक माणसं कायमची निघून गेली. त्यामुळे संसर्गाची भीती येथे प्रत्येकाला आहे. अशा भयग्रस्त परिस्थितीत पॉझिटिव्ह ‘दृष्टी’ बाळगत ‘सृष्टी’ने एक दोन नव्हे तब्बल १७,२३० रुग्णांना प्रत्यक्ष स्पर्श करत त्यांच्या नाकातोंडातून कोविड विषाणूचे स्वॅब घेण्याचे काम केले आहे. सृष्टी महेंद्र डोंगरे (२३) असे या कोरोना योद्धा तरुणीचे नाव आहे. ती स्थानिक ग्रामीण रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदावर कार्यरत आहे. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून सृष्टी शहरातील कोविड तपासणी केंद्रात सतत रुग्णांचे स्वॅब घेण्याच्या कामात व्यस्त आहे. तालुक्यात आतापर्यंत अंदाजे ५० हजारावर स्वॅब घेण्यात आले. यात एकट्या सृष्टीने जीव धोक्यात टाकून अँन्टीजन १२ हजार तर आरटीपीसीआरचे ५,२३० असे एकूण १७,२३० जणांचे स्वॅब घेतले. वेळीच तपासणी, निदान व उपचारामुळे ९८ टक्के रुग्णांनी कोरोनावर मातही केली. सृष्टी अवघ्या १६ वर्षाची असताना वडिलांचे निधन झाले. आई एका खाजगी रुग्णालयात काम करून कुटुंबाचा गाडा ओढतेय तर लहान भाऊ शिकत आहे. त्यामुळे सृष्टीला परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे. कंत्राटी तत्वावर असताना सुध्दा कोरोनाशी दोन हात करायचेच... लढायचे आणि हे युध्द जिंकायचे असा संकल्प सृष्टीने केला आहे. लोकसेवेची ही दृष्टीच सृष्टीच्या कर्तव्यास बळ देत आहे.
--
वर्षभरापासून वेगळेपण
स्वॅब घेण्याचे कर्तव्य बजावताना आपल्यामुळे कुटुंबीय कोरोनाच्या तावडीत सापडू नये याची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे गत वर्षभरापासून सृष्टी आई व भावापासून चार हात लांब आहे. घरीच मुक्काम असला तरी वेगळ्या खोलीत राहून कुटुंबीयांशी बहुतांश फोनवरच ती बोलते. सृष्टी सारखेच आरोग्य सेवक गजू गव्हारे, गोविंदा नंदनवार, पंजाब धोटे, दीपक खोब्रागडे, बाळकृष्ण देशपांडे, संदीप पेदापल्लावार, विठ्ठल ढोले, सुनील गायकवाड, जयवंत राऊत, सुरेश नन्नावरे, धनंजय बालपांडे, भाग्यवान मेहेर हे सुध्दा तालुक्यातील गावागावात स्वॅब टेस्टींगचे काम करत आहे.
--
इतरांप्रमाणे आम्हाला सुद्धा संसर्गाची भीती आहे. स्वॅब घेताना विषाणूचा संसर्ग कधी ना कधी आपल्याला शिवणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक स्वॅब घेतो. संसर्गाच्या भीतीमुळे कर्तव्याला बगल देणे योग्य नाही. कोरोनाशी लढा हे राष्ट्रीय कर्तव्य आहे.
-सृष्टी डोंगरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रामीण रुग्णालय,भिवापूर.