नागपूर विभागातील २३ महसूल कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदार पदी पदोन्नती
By आनंद डेकाटे | Updated: May 15, 2026 16:25 IST2026-05-15T16:23:43+5:302026-05-15T16:25:24+5:30
Nagpur : महसूल व वन विभागाने नागपूर विभागातील महसूल प्रशासनात मोठे फेरबदल केले असून, सहायक महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी संवर्गातील २३ कर्मचाऱ्यांची नायब तहसीलदार पदी पदोन्नती करण्यात आली आहे.

23 revenue employees in Nagpur division promoted to the post of Naib Tehsildar
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महसूल व वन विभागाने नागपूर विभागातील महसूल प्रशासनात मोठे फेरबदल केले असून, सहायक महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी संवर्गातील २३ कर्मचाऱ्यांची नायब तहसीलदार पदी पदोन्नती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला.
या पदोन्नती प्रक्रियेत नागपूर विभागातील विविध जिल्ह्यांत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पदोन्नती प्रक्रियेत सहायक महसूल अधिकारी संवर्गातील ३ कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यापैकी २ जणांना नियमित, तर एका कर्मचाऱ्याला विभागीय चौकशीच्या अधीन राहून तदर्थ पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच, २० मंडळ अधिकाऱ्यांना त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार नायब तहसीलदार पदी नियमित पदोन्नती देण्यात आली आहे.
पदोन्नती मिळालेल्या या सर्व अधिकाऱ्यांना नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि गोंदिया जिल्ह्यातील रिक्त पदांवर नियुक्त करण्यात आले असून त्यांना तातडीने रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासनाने या सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या पदावरून 'एकतर्फी कार्यमुक्त' केले असून, आदेश प्राप्त झाल्यापासून ३० दिवसांच्या आत नवीन पदावर रुजू होणे बंधनकारक केले आहे. विहित मुदतीत रुजू न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांची पदोन्नती रद्द केली जाईल आणि पदोन्नतीनंतर प्रत्यक्ष रुजू झाल्याशिवाय त्यांना नवीन वेतनश्रेणीचा लाभ मिळणार नाही, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
पदोन्नती निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असल्याने संबंधित अधिकाऱ्यांना नियमितपणाचा कोणताही हक्क सांगता येणार नाही. या निर्णयामुळे नागपूर विभागातील महसूल यंत्रणेतील रिक्त पदे भरली गेल्याने प्रशासकीय कामांना गती मिळणार आहे.