वैज्ञानिकाच्या लॉकर्समध्ये आढळले २३ लाख
By Admin | Updated: March 13, 2015 02:40 IST2015-03-13T02:40:40+5:302015-03-13T02:40:40+5:30
लाच घेताना सीबीआयच्या जाळ्यात अडकलेले गोकुळपेठ येथील भारतीय मानक ब्युरोचे ‘क’ श्रेणीचे वैज्ञानिक बिपीन वीरेंद्र जांभूळकर यांच्या दोन लॉकर्समध्ये २३ लाख रुपये रोख ...

वैज्ञानिकाच्या लॉकर्समध्ये आढळले २३ लाख
नागपूर : लाच घेताना सीबीआयच्या जाळ्यात अडकलेले गोकुळपेठ येथील भारतीय मानक ब्युरोचे ‘क’ श्रेणीचे वैज्ञानिक बिपीन वीरेंद्र जांभूळकर यांच्या दोन लॉकर्समध्ये २३ लाख रुपये रोख आणि मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने आढळून आले. त्यामुळे सीबीआय अधिकाऱ्यांनी त्यांना गुरुवारी पुन्हा सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.एस. मुरकुटे यांच्या न्यायालयात हजर करून, त्यांचा १६ मार्चपर्यंत वाढीव पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला.
हिंगणघाट येथील उद्योजक आणि वर्धा येथील बाबूजी अॅक्वा कंपनीचे मालक अशफाक अली उस्मान अली यांच्याकडून ९ मार्च रोजी १५ हजाराची लाच घेताना सापळा रचून जांभूळकर यांना रंगेहात अटक करण्यात आली होती.
पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची ही कंपनी होती. या कंपनीला भारतीय मानक ब्युरोचा परवाना होता. एप्रिल २०१४ मध्ये या कंपनीच्या परवान्याची मुदत संपली होती. त्यामुळे या कंपनीचा एकूण व्यवहार बंद झाला होता. भारतीय मानक ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीवर धाड घालून आकस्मिक पाहणी केली होती. त्यात ही कंपनी बंद असल्याचे निदर्शनास आले होते. या कंपनीच्या गैरप्रकाराच्या संदर्भात भारतीय मानक ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी फौजदारी कारवाई करून वर्धा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात खटला भरला होता. २० डिसेंबर २०१४ रोजी खटल्याचा निकाल लागून अशफाक अली हे निर्दोष ठरले होते. वैज्ञानिक बिपीन जांभूळकर यांनी अशफाक अली यांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या निर्णयाच्याविरुद्ध अपील दाखल करण्याची तसेच हे प्रकरण दिल्लीपर्यंत नेण्याची धमकी देऊन ५० हजाराच्या लाचेची मागणी केली होती. सौदेबाजी होऊन १५ हजार रुपये घेत असताना जांभूळकर यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या निवासस्थानाच्या तसेच बँक खाते व लॉकर्सच्या झडतीत मोठ्या प्रमाणावर माया आढळून आली. त्यांची अचल संपत्ती हुडकून काढली जात आहे. तपासासाठी वाढीव पोलीस कोठडी मागण्यात आली. न्यायालयात सीबीआयचे विशेष वकील ए.एच. खान यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)