पतसंस्थेत २.२५ कोटीचा घोटाळा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:56 IST2021-02-05T04:56:04+5:302021-02-05T04:56:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विश्वकर्मा बिगरशेती सहकारी पतसंस्थेत झालेल्या सव्वा कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने पतसंस्थेच्या ...

2.25 crore scam in credit unions () | पतसंस्थेत २.२५ कोटीचा घोटाळा ()

पतसंस्थेत २.२५ कोटीचा घोटाळा ()

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विश्वकर्मा बिगरशेती सहकारी पतसंस्थेत झालेल्या सव्वा कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने पतसंस्थेच्या अध्यक्षासह तीन आरोपींना अटक केली आहे. पुरुषोत्तम तुलसीदाल बेले (४९) रा. सर्वश्रीनगर, नरेश तुलसीराम दांडेकर (४७) रा. शारदा चौक, अयोध्यानगर आणि वासुदेव विठोबाजी हिरुडकर (४८) रा. आनंदनगर, सक्करदरा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

२००५ मध्ये बेले आणि हिरुडकर यांनी पतसंस्था सुरू केली होती. यात पुरुषोत्तम बेले-अध्यक्ष, नरेश दांडेकर-उपाध्यक्ष, दिगांबर येवले-व्यवस्थापक, स्वर्णा प्रमोद काेकडे-लेखपाल होते. पतसंस्थेतर्फे सर्व प्रकारचे बँकेचे व्यवहार केले जात होते. वेगवेगळ्या योजनांमध्ये रक्कम जमा करण्यासोबतच कर्जही वितरित केले जात होते. आरोपींनी संचालक मंडळाच्या मदतीने २०१६ ते २०१९ दरम्यान जवळपास सव्वा दोन कोटी रुपयांचा अपहार झाला. गुंतवणुकीचा कालावधी पूर्ण झाल्यावर लोक आपली रक्कम परत मागू लागले. आरोपींनी दस्तावेजामध्ये हेराफेरी केली आणि लोकांना पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. त्याच प्रकारे त्यांनी नियमांचे उल्लंघन करून वेगवेगळ्या रूपात कर्ज दिले. पतसंस्थेत अपहार झाल्याची तक्रार मिळताच लेखा परीक्षक पुंडलिक पालांदूरकर यांनी लेखा परीक्षण केले. यात सव्वादोन कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे आढळून आले. या आधारावर वाठोडा पोलीस ठाण्यात फसवणूक व महाराष्ट्र गुंतवणूकदार हित संरक्षण अधिनियम (एमपीआयडी)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

१५ जानेवारी रोजी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. आर्थिक शाखेने तपास सुरू करून आरोपींचा शोध घेतला. यासाठी तीन पथके तैनात करण्यात आली. त्यांनी बेले, दांडेकर व हिरुडकर यांना अटक केली. ते दिगांबर येवले याला दोषी असल्याचे सांगत आहे. बेले शिक्षक आहे. तर हिरुडकरचे प्लायवूडचे दुकान आहे. दोघेही नातेवाईक आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, पतसंस्थेचे कामकाज येवलेच सांभाळत होता. त्यालाच अधिकार सोपवण्यात आले होते. ते आपापल्या कामात व्यस्त राहत होते. बेले यापूर्वीही एका पतसंस्थेशी जुळला होता. त्यामुळे त्याला पतसंस्थेच्या व्यवहाराची माहिती नसणे हे शक्य नाही. अटक केलेल्या आरोपींना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे. आर्थिक शाखेने पतसंस्थेशी संबंधित ज्या लोकांची फसवणूक झाली असेल अशा लोकांना तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. ही कारवाई डीसीपी विवेक मसाळ यांच्या मार्गदर्शनात एपीआय सरयू देशमुख, हवालदार गजानन मोरे, विजय द्विवेदी, सुनील मडावी, प्रशांत किंदर्ले, भारती माडे आणि सीमा सोनटक्के यांनी केली.

Web Title: 2.25 crore scam in credit unions ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.