निवडणूक रोखे प्रकरण: नागपूरच्या डब्बा ट्रेडिंग फर्मकडूनही २२ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 09:20 AM2024-03-17T09:20:25+5:302024-03-17T09:22:01+5:30

एल-७ हायटेक प्रायव्हेट आधीपासूनच होती ईडी आणि आयटीच्या रडारवर

22 crores also from Dabba Trading Firm of Nagpur | निवडणूक रोखे प्रकरण: नागपूरच्या डब्बा ट्रेडिंग फर्मकडूनही २२ कोटी

निवडणूक रोखे प्रकरण: नागपूरच्या डब्बा ट्रेडिंग फर्मकडूनही २२ कोटी

मंगेश इंदापवार, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: आयकर विभाग, अंमलबजावणी संचालनालयाने छापे घातलेल्या शहरातील एल-७ हायटेक ग्रुपने २०१६ ते २०२३ या काळात इलेक्टोरल बाँडमध्ये २२ कोटी रुपयांचे योगदान दिले. छत्तरपूर फार्म्स लाँच करणाऱ्या रवी अग्रवाल यांच्या मालकीची ही कंपनी आहे.  या ग्रुपने ऑक्टोबर २०२३ मध्ये तीन दिवसांत निवडणूक रोख्यांमध्ये भरीव योगदान दिले. १० ऑक्टोबरला नऊ कोटी, १२ ऑक्टोबर रोजी आठ कोटी आणि १३ ऑक्टोबर रोजी पाच कोटी रुपयांचे योगदान दिले. स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.

लॉटरी किंग म्हणून ओळखण्यात येणारा सँटियागो मार्टिन याचे नाव इलेक्टोरल बाँडचा सर्वात मोठा खरेदीदार म्हणून समोर आले. या प्रकरणाला दाबण्यासाठी सत्ताधारी पक्ष आणि काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ राजकारणी छत्तरपूर फार्म्समधील पार्ट्यांमध्ये सहभागी होत आहेत. २०१६ साली ए-७ ग्रुप ही कंपनी चर्चेत आली होती.

डब्बा व्यापारातील व्यवहारामुळे पोलिसांनी शहरात मोठ्या प्रमाणावर छापे टाकले होते.  आयकर विभागाच्या २०० अधिकाऱ्यांच्या पथकाने सखोल तपास करत १० मे २०२३ रोजी एल-७ ग्रुपशी संबंधित १० हवाला व डब्बा व्यापाऱ्यांच्या १७ ठिकाणांवर धाडी टाकल्या होत्या. महत्त्वाचे ऐवज यात जप्त करण्यात आले होते.

विविध ठिकाणी छापे

डब्बा व्यापारी रवी अग्रवाल, हवाला ऑपरेटर गोपू मालू, लाला जैन, पारस जैन, शैलेश लखोटिया, इस्रायल सेठ, हेमंत तन्ना, करणी थावरानी, प्यारे खान आणि चार्टर्ड अकाउंटंट रवी वानखेडे यांची कार्यालये आणि निवासस्थानांवर छापे टाकण्यात आले. शहरातील लकडगंज, टेलिफोन एक्स्चेंज चौक, वर्धमान नगर, गरोबा मैदान, मेडिकल चौक आदी ठिकाणी छापे टाकण्यात आले.

Web Title: 22 crores also from Dabba Trading Firm of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.