विदर्भात २१ नवे रुग्ण; रुग्णसंख्या ६५२
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 11:03 IST2020-05-11T11:02:28+5:302020-05-11T11:03:31+5:30
आतापर्यंत ग्रीन झोन असलेल्या वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे. यात एका रुग्णांचा व एकाचा मृत्यूनंतरचा अहवाल पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे, अमरावती जिल्ह्यातही एका रुग्णाचा मृत्यूनंतरचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर अकोल्यात उपचार घेत असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला.

विदर्भात २१ नवे रुग्ण; रुग्णसंख्या ६५२
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आतापर्यंत ग्रीन झोन असलेल्या वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे. यात एका रुग्णांचा व एकाचा मृत्यूनंतरचा अहवाल पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे, अमरावती जिल्ह्यातही एका रुग्णाचा मृत्यूनंतरचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर अकोल्यात उपचार घेत असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला. विदर्भात तीन मृतांसह संख्या ३१ वर पोहोचली आहे. या शिवाय, विदर्भात २१ नवे रुग्ण आढळून आल्याने रुग्णांची संख्या ६५२ झाली आहे. नागपुरात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. रविवारी पुन्हा ११ नमुने पॉझिटिव्ह आले. येथील रुग्णांची संख्या २९४ वर पोहोचली आहे. अकोला जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असताना मृताची संख्याही वाढत आहे. येथे सात नव्या रुग्णांची नोंद तर उपचार घेत असलेल्या ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. येथील रुग्ण संख्या १५४ तर मृताची संख्या १२ वर गेली आहे. यातील एका रुग्णाने आत्महत्या केली आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथून नागपूर मेडिकलमध्ये उपचारासाठी आणलेल्या रुग्णाचा वाटेतच मृत्यू झाला. या रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आल्याने अमरावती जिल्ह्यात आणखी एका मृताची नोंद झाली आहे. येथील रुग्णसंख्या ७९ तर मृताची संख्या १३ झाली आहे. वर्धा जिल्ह्यात पहिल्यांदाच कोरोनाबाधितांची नोंद झाली. यात उपचार घेत असलेला एका रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले तर उपचारासाठी नेत असलेल्या ३५ वर्षीय महिलेचा वाटेतच मृत्यू झाला. या महिलेचा नमुना पॉझिटिव्ह आला. बुलडाणा जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यात एकाही नव्या रुग्णाची नोंद नाही. यातच नोंद झालेले २४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी गेले. पुढील २२ दिवसांत या रुग्णांमध्ये लक्षणे न आढळल्यास व नव्या रुग्णाची नोंद न झाल्यास हा जिल्हा कोरोनामुक्त होऊ शकतो. यवतमाळ जिल्ह्यात एकाही रुग्णाची नोंद नाही. येथील रुग्णसंख्या ९७ असून यातील १५ रुग्ण कोरोनामुक्त झाले.