२१ कोटींचे बोगस बियाणे, तीन कोटींचा खतसाठा जप्त
By Admin | Updated: June 8, 2014 00:51 IST2014-06-08T00:51:08+5:302014-06-08T00:51:08+5:30
पश्चिम विदर्भात कृषी खात्याच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाने खरीप हंगामात आतापर्यंत २१ कोटी रुपयांचे सोयाबीन व कपाशीचे बोगस बियाणे आणि सुमारे तीन कोटी रुपयांचा बोगस खतसाठा जप्त केला आहे.

२१ कोटींचे बोगस बियाणे, तीन कोटींचा खतसाठा जप्त
अमरावती विभाग : अकोल्यात अद्याप कारवाईची प्रतीक्षा
यवतमाळ : पश्चिम विदर्भात कृषी खात्याच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाने खरीप हंगामात आतापर्यंत २१ कोटी रुपयांचे सोयाबीन व कपाशीचे बोगस बियाणे आणि सुमारे तीन कोटी रुपयांचा बोगस खतसाठा जप्त केला आहे. मात्र या विभागाने अद्याप अकोला जिल्ह्यात एकही कारवाई न केल्याने तेथे ‘आलबेल’ आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बियाणे, खते, कीटकनाशके यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अमरावती विभागात ६२ भरारी पथके कार्यरत आहेत. त्या माध्यमातून कृषी विभाग बोगस बियाणे, जादा दराने विक्री, साठेबाजी, काळा बाजार यावर नियंत्रण ठेवत आहे. आतापर्यंत अमरावती, वाशिम, बुलडाणा आणि शुक्रवारी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे कारवाई झाली. अकोला येथे मात्र अद्याप कारवाईची प्रतीक्षा आहे. पुसद येथे शुक्रवारी ७२ लाख रुपयांचे बोगस बीटी बियाणे जप्त करण्यात आले. तत्पूर्वी बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील खामगाव रोडस्थित मे ईगल सिड्स अँड बायोटेक लि. इंदोर या कंपनीच्या गोदामाची तपासणी करण्यात आली. तेथे २0 कोटी रुपये किमतीचा २१ हजार ५0४ मेट्रिक टन सोयाबीन बियाण्यांचा साठा जप्त करण्यात आला. तेथून बियाण्यांचे २६ नमुने घेण्यात आले. ते सर्व सदोष नमुने अप्रमाणित आढळल्याने संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जात आहे. वाशिम येथे कोरोमंडल इंटरनॅशनल लि. या रासायनिक खत उत्पादक कंपनीच्या गोदामाची तपासणी केली. तेथे २ कोटी ५३ लाख ४५ हजार ५६0 रुपये किमतीच्या १४0८ मेट्रिक टन खत साठय़ास विक्रीबंद आदेश दिले गेले. संबंधिताविरुद्ध पोलिसात गुन्हाही नोंदविण्यात आला. तेथून खताचे नऊ नमुने घेतले असले तरी त्याच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे तीन कृषी केंद्रांमधून रासायनिक खताचे नऊ नमुने घेतले गेले. तेथून ११ लाख ७७ हजार ८00 रुपये किमतीचा १३६ मेट्रिक टन खतसाठा जप्त करण्यात आला.
कृषी खात्याने काल पुसदमधील बोगस बीटी बियाणे कारखान्याचा पर्दाफाश केला. यवतमाळ जिल्ह्यातील या हंगामातील ही पहिलीच कारवाई ठरली. कृषी सहसंचालक अशोक लोखंडे, विभागीय गुणवत्ता नियंत्रण अधिकारी जी.टी. देशमुख यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी)