योगेश पांडे,नागपूर: कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरगावातील गर्ग खदानीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. राज्य शासनाने ही बाब गंभीरतेने घेतली. लीज संपलेल्या खाणपट्ट्यांची तपासणी करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. जर यात काही अनियमितता आढळली तर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
कुहीतील संबंधित खाणपट्ट्यात साचलेल्या पाण्यात बुडून दोन दिवसांअगोदर दोन मुले, दोन महिला आणि एका युवकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी सुरूच आहे. बावनकुळे यांनी ही बाब गंभीरतेने घेतली. मंत्रालयात आयोजित बैठकीत सुरगाव येथील ३४४ एकर शासकीय जागेचा उपयोग आणि खाणपट्ट्यांबाबत चर्चा झाली.
या अपघाताच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी लीज संपलेल्या खाणपट्ट्यांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. मी स्वतः खाणपट्ट्यांची तपासणी करेन आणि अनियमितता आढळल्यास कठोर कारवाई करेन, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
नागपूर जिल्ह्यातील अशा खदानी भरून त्या समतल करण्यात याव्या. तसेच खाणपट्ट्यांची नियमित तपासणी आवश्यक आहे. शर्तभंग करणाऱ्या खाणींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर जिल्ह्यातील खदानींमध्ये साचलेल्या पाण्यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याने उपाययोजनांचा आग्रह बावनकुळे यांनी धरला. नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी सर्व खाणपट्ट्यांची तपासणी आणि देखरेखीवर भर देण्याचे यावा. सोबतच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी खाणींच्या सुरक्षिततेबाबत ठोस पावले उचलण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.