मेडिकलच्या कॅन्सर इन्स्टिट्युटसाठी १९१ कापणार, ६,५०० झाडे लावणार
By सुमेध वाघमार | Updated: October 10, 2023 19:59 IST2023-10-10T19:59:02+5:302023-10-10T19:59:11+5:30
मेडिकलचा कॅन्सर हॉस्पिटलला मंजुरी मिळूनही ११ वर्षे कागदावरच होते.

मेडिकलच्या कॅन्सर इन्स्टिट्युटसाठी १९१ कापणार, ६,५०० झाडे लावणार
सुमेध वाघमारे, नागपूर : बहुप्रतिक्षेत असलेल्या मेडिकलच्या कॅन्सर हॉस्पिटलचा प्रस्तावित जागेवरील १९१ झाडांमुळे बांधकाम रखडले होते. अखेर वन विभागाने झाडे कापण्याला परवानगी देत तर, मनपाच्या उद्यान विभागाने त्या बदल्यात सहा हजार झाडे लावण्यासाठी पुढाकार घेतल्याने रुग्णालयाच्या बांधकामातील अडसर दूर झाल्याचे बोलले जात आहे.
मेडिकलचा कॅन्सर हॉस्पिटलला मंजुरी मिळूनही ११ वर्षे कागदावरच होते. अमृत महोत्सवाच्या निमित्ताने नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५१४ कोटींच्या कामाचे भूमिपूजन केले. त्यात मेडिकलच्या कॅन्सर हॉस्पिटलच्या बांधकामाचाही समावेश होता. या कार्यक्रमामुळे बांधकामाला वेग आला. टीबी वॉर्डच्या परिसरातील २२ हजार ५७० चौरस मीटरची जागेवर हॉस्पिटलचे बांधकाम प्रस्तावित आहे. या जागेवर १९१ झाडे आहे. या झाडाच्या कापणीसाठी मेडिकल प्रशासनाने महानगरपालिकेच्या उद्यान विभागाला पत्र दिले. विभागाने या झाडाच्या मोबदल्यात ६,५०० झाडे लावण्याचे व ७ वर्षे त्याची देखभाल करण्याचा सूचना केल्या.
परंतु मेडिकलकडे जागा उपलब्ध नसल्याने त्यांनी उद्यान विभागाला यावरील पर्याय सूचविण्यास सांगितले. विभागाने एका एजन्सीकडे याची जबाबदारी देण्यासाठी पुढाकार घेतला. यातच वनविभागाकडूनही झाडे कापण्याला मंजुरीही मिळाली. यामुळे लवकरच बांधकाम सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.