नागपुरातील ‘मेडीट्रीना हॉस्पिटल’मध्ये १८ कोटींचा गोलमाल, संचालक समीर पालतेवारसह १८ जणांविरोधात गुन्हा दाखल
By योगेश पांडे | Updated: September 18, 2025 22:05 IST2025-09-18T22:04:53+5:302025-09-18T22:05:37+5:30
पार्टनरनेच केली पोलिसांत तक्रार : डिजिटल मार्केटिंग-जाहिरातीच्या नावाखाली गैरप्रकार

नागपुरातील ‘मेडीट्रीना हॉस्पिटल’मध्ये १८ कोटींचा गोलमाल, संचालक समीर पालतेवारसह १८ जणांविरोधात गुन्हा दाखल
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : रामदासपेठेतील ‘मेडीट्रीना’ इस्पितळात तब्बल १८ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तेथील संचालक डॉ.समीर पालतेवार, सोनाली पालतेवार यांच्यासह १८ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इस्पितळाच्या पार्टनरनेच यासंदर्भात तक्रार केली. डिजिटल मार्केटिंग-जाहिरातीच्या नावाखाली गैरप्रकार झाल्याची माहिती समोर आली आहे. सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
गणेश रामचंद्र चक्करवार (६५, कॅनल रोड, रामदासपेठ) यांनी ही तक्रार केली. २००६ मध्ये त्यांनी डॉ.पालतेवार व इतरांसोबत मिळून व्हीआरजी हेल्थ केअर प्रा.लि.कंपनी सुरू केली होती व २०१२ मध्ये मेडीट्रीना इस्पितळाची स्थापना झाली. २०१६ मध्ये इतर लोक बाहेर पडले व चक्करवार तसेच डॉ.पालतेवार हेच ५०-५० टक्क्यांचे भागीदार झाले. कंपनीच्या नावावर नवीन इस्पितळाचे बांधकाम करण्यासाठी नियमांनुसार डॉक्टरकडे ६७ टक्के शेअर असणे आवश्यक असल्याचे डॉ.पालतेवारने सांगितले. त्यामुळे चक्करवार यांनी १७ टक्के शेअर्स तात्पुरत्या स्वरूपात बुक व्हॅल्युवर ट्रान्सफर केले. तसेच सोनाली पालतेवारला अतिरिक्त संचालक बनविले. मात्र त्यानंतर डॉ.पालतेवारांनी मर्जीने निर्णय घेण्यास सुरुवात केली. पालतेवार दांपत्याने मुलगा निनादसोबत मिळवून ऑब्व्हिएट हेल्थकेअर प्रा.लि. ही कंपनी स्थापन केली.
त्यांनी २०२०-२१ मध्ये मेडीट्रीनाच्या खात्यातून २०२०-२१ मध्ये दोन कोटी, २०२१-२२ मध्ये २.९१ कोटी, २०२२-२३ मध्ये ३.३६ कोटी व २०२३-२४ मध्ये ३.१३ कोटी असे ११.४१ कोटी रुपये काढले. याची कुठलीही कल्पना चक्करवार यांना देण्यात आली नाही. डॉ.समीर व सोनाली यांनी मिळून मेडीट्रीनात काम करणारे कर्मचारी व इतर व्यक्तींच्या नावाने खोटी बिले तयार करून करोडो रूपये कंपनीच्या बँक खात्यातुन काढले. चक्करवार यांनी वार्षिक अहवालाची पाहणी केली असता आरोपींनी डिजिटल मार्केटिंग व जाहिरातींच्या नावाखाली बनावट बिले तयार केल्याची बाब समोर आली.
मेडीट्रीनाचे अकाऊंटन्ट अर्पण किशोर पांडे यांच्या खात्यात २३.९० लाख, किशोर पांडे यांच्या खात्यात ४४.४३ लाख, अभिषेक किशोर पांडे यांच्या खात्यात पाच लाख, ॲबस्ट्रॅक्ट आयटी ग्रुपच्या खात्यात ११.८७ लाख, आकाश मधुकरराव केदारची कंपनी एके हेल्थकेअर सर्व्हिसेसच्या खात्यात ८८.९३ लाख, मुकेश बडवाईकच्या एमबी हेल्थ केअर सर्व्हिसेसच्या खात्यात ४०.९३ लाख, वैशाली रामदास बडवाईक यांच्या खात्यात ४६.७० लाख, तृप्ती प्रकाश घोडे यांच्या खात्यात ४२ लाख, रिता मुकेश बडवाईक (४०.९८ लाख), कल्याणी बडवाईक (४९.७३ लाख), नईम दिवाण (४२.५१ लाख), सर्वेश ढोमणे (२१ लाख), प्रियंका सर्वेश ढोमणे यांच्या पी.एस.हेल्थ केअर सर्व्हिसेसच्या खात्यात ४५.४९ लाख, अलाईड हेल्थकेअर सर्व्हिसेसच्या खात्यात ३८.६० लाख जमा करण्यात आले. चक्करवार यांच्या तक्रारीवरून वरील सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२०१९, २०२१ मध्येदेखील गुन्हा
चक्करवार यांच्या तक्रारीवरून डॉ.पालतेवारविरोधात २०१९ व २०२१ मध्येदेखील फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. राजीव गांधी जीवनदायी योजने अंतर्गत मेडीट्रीना हॉस्पीटल मध्ये भरती झालेल्या रुग्णाकडून डॉ.पालतेवार अतिरिक्त पैसे घ्यायचे. तसेच कोवीडदरम्यान त्यांनी रुग्णांना जास्त रकमेची बिले देत फेरफार केली होती.