महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये पकडले १.६६ लाख रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 20:14 IST2019-03-30T20:11:50+5:302019-03-30T20:14:02+5:30
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे १.६६ लाख रुपये घेऊन जात असलेल्या दोघांना शनिवारी महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये कामठी रेल्वेस्थानकावर अटक केली. पैशांबाबत कोणताही पुरावा न देऊ शकल्यामुळे दोघांना रामटेक लोकसभा मतदार संघाच्या पथकाकडे सोपविण्यात आले.

कामठी रेल्वेस्थानकावर १.६६ लाख घेऊन जाताना पकडलेल्या आरोपीसह रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांड्येय, सहायक सुरक्षा आयुक्त अरुण कुमार स्वामी, मो. मुगिसुद्दीन आणि इतर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे १.६६ लाख रुपये घेऊन जात असलेल्या दोघांना शनिवारी महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये कामठी रेल्वेस्थानकावर अटक केली. पैशांबाबत कोणताही पुरावा न देऊ शकल्यामुळे दोघांना रामटेक लोकसभा मतदार संघाच्या पथकाकडे सोपविण्यात आले.
विजय कुमार भगवानदास सेवलानी (४४) रा. झुलेलाल कॉलनी, फुलचूर, जि. गोंदिया आणि रामगोविंद सोहिंदराम काळे (५६) रा. लक्ष्मीनगर, गोंदिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांड्येय, सहायक सुरक्षा आयुक्त अरुण कुमार स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली गठित करण्यात आलेल्या टास्क टीममधील उपनिरीक्षक मो. मुगिसुद्दीन, पी. एन. रायसेडाम, ईशांत दीक्षित, आर. एस. बागडेरिया हे कामठी रेल्वेस्थानकावर गस्त घालत होते. तेवढ्यात त्यांना दोन व्यक्ती संशयास्पद स्थितीत आढळल्या. त्यांच्याजवळ काळ्या रंगाची हँडबॅग होती. बॅगमध्ये १.५० लाख रुपये असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु संबंधित पैशाबाबत कोणतेही बिल, रसीद, अधिकारपत्र त्यांनी सादर केले नाही. यातील एका व्यक्तीने आपण फळ विक्रेता तर दुसऱ्याने नोकर असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुक २०१९ नुसार विनापुरावा ५० हजारापेक्षा अधिक रकमेची वाहतूक करण्यास मनाई असल्याची माहिती विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांड्येय यांनी दिली. त्यामुळे याची माहिती रामटेक लोकसभा मतदार संघाचे अधिकारी यांना देण्यात आली. पकडलेल्या रकमेचे जप्तीपत्र तयार करून रक्कम निवडणूक आयोगाचे चालते फिरते पथकातील अधिकारी संजय कांबळे, पोलीस उपनिरीक्षक निरंजना उमाळे यांच्या स्वाधीन करण्यात आली.