लाखोंच्या लाभाचे आमिष दाखवून १६ लाख ५० हजार हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 02:00 IST2019-01-19T01:58:35+5:302019-01-19T02:00:25+5:30
क्रेशरच्या व्यवसायात महिन्याला लाखोंचा फायदा होतो, अशी थाप मारून एकाच परिवारातील तिघांनी एका तरुणाचे १६ लाख, ५० हजार रुपये हडपले.

लाखोंच्या लाभाचे आमिष दाखवून १६ लाख ५० हजार हडपले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्रेशरच्या व्यवसायात महिन्याला लाखोंचा फायदा होतो, अशी थाप मारून एकाच परिवारातील तिघांनी एका तरुणाचे १६ लाख, ५० हजार रुपये हडपले.
चिंचभुवन परिसरात राहणारे समीर सुरेंद्र लोही (वय ३०) यांनी गिट्टीखदान ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार, त्यांची आकाश दुर्गाप्रसाद तिवारी सोबत जुनी ओळख होती. या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाल्यानंतर तिवारीने लोही यांना विश्वासात घेऊन भागीदारीत क्रेशरचा व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. महिन्याला लाखोंचा लाभ मिळतो, असे सांगितल्यामुळे लोहींनी आकाश तिवारी तसेच गगन तिवारी आणि कविता तिवारी यांच्यासोबत भागीदारीत व्यवसाय करण्याचा करार केला. आरोपींनी सांगितल्याप्रमाणे लोहींनी त्यांना १७ मार्च २०१७ ते १७ एप्रिल २०१८ या कालावधीत एकूण १६ लाख, ५० हजार रुपये दिले. त्यानंतर आरोपींनी लोहींना लाखोंचा नफा तर सोडा त्यांची मुद्दल रक्कमही परत केली नाही. प्रत्येक वेळी काही ना काही कारण सांगून ते टाळाटाळ करीत असल्याने लोहींना संशय आला. त्यांनी गिट्टीखदान ठाण्यात आरोपींविरुद्ध फसवणुकीची तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशीनंतर फसवणुकीच्या आरोपाखाली आकाश, गगन आणि कविता तिवारीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.