उधारीत तांदूळ घेऊन १.५७ कोटींनी फसवणूक; राईस मिल संचालकांना घातला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 03:07 PM2023-03-06T15:07:38+5:302023-03-06T15:09:50+5:30
मृत साथीदाराला जिवंत असल्याचे सांगून फसवणूक
नागपूर : उधारीत तांदूळ खरेदी करून राईस मिलच्या संचालकांची १.५७ कोटींनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली असून पोलिसांनी या रॅकेटच्या दोन सदस्यांना अटक केली आहे.
सागर प्रभाकर पराये (वय २६), साहिल प्रमोद मते (१८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. फिर्यादी सचिन लक्ष्मीनारायण अग्रवाल (३८, महाजनपुरा पारडी) हे राईस कमिशन एजंट आहेत. दुकानदारांना तांदळाचे सँपल दाखवून राईस मिलमधून कमिशनवर माल मिळवून देतात. त्यांच्या ओळखीचे सारंग नाकाडे यांनी त्यांची ओळख अमित विजय बानाबाकोडे (३८, दर्शन कॉलनी नंदनवन) यांच्याशी करून दिली.
अमितचे बालाजी अँड कंपनी होलसेल व चिल्लर विक्रीचे मोहितनगर उमरेड रोड बहादुरा येथे दुकान असल्याचे सांगितले. त्यामुळे सचिन अग्रवाल यांनी त्यांना सँपल दाखवून माल पाठविला. त्यावर त्यांनी तीन-चार दिवसांत पेमेंट दिले. अमितने अनेकदा वेगवेगळ्या मिलमधून माल घेऊन वेळेवर पेमेंट दिल्यामुळे अग्रवाल आणि राईस मिलवाल्यांचा त्याच्यावर विश्वास होता. दरम्यान, १७ जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान अमितने वेगवेगळ्या २१ राईस मिलमधून १ कोटी ५६ लाख ९० हजार ५९८ रुपयांचा माल घेतला.
अमितने त्याचे पैसे न दिल्यामुळे राईस मिलवाल्यांनी अग्रवाल यांना संपर्क साधला. अग्रवाल यांनी चौकशी केली असता अमितचा २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मृत्यू झाल्याचे समजले. यात आरोपी सहदेव गोसावी, किसन गोसावी, साहिल मते, प्रभाकर पराये यांनी अमितच्या मृत्यूनंतरही राईस मिल व्यापाऱ्यांकडून उधारीवर माल घेऊन त्यांची विक्री करून त्यांची फसवणूक केली. सक्करदरा पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू केला आहे.