अर्थसंकल्पात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला १५०० कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:14 IST2021-02-06T04:14:05+5:302021-02-06T04:14:05+5:30
नागपूर : केंद्रीय अर्थसंकल्पात मध्य रेल्वे झोनसाठी ७७१५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर नागपूर विभागाला १५०० कोटी ...

अर्थसंकल्पात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला १५०० कोटी
नागपूर : केंद्रीय अर्थसंकल्पात मध्य रेल्वे झोनसाठी ७७१५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर नागपूर विभागाला १५०० कोटी रुपये मिळाले आहेत. यात जुन्या कामांसाठी अधिक तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती नागपूर विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिचा खरे यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.
रिचा खरे म्हणाल्या, ओपन लाइनसाठी ३५० कोटी रुपये आणि कन्स्ट्रक्शन वर्कसाठी ११५० रुपये देण्यात आले आहेत. यातही जुन्या कामांसाठी १३५० कोटी रुपये आणि नव्या कामांसाठी १५० कोटी रुपये मिळाले आहेत. नव्या रेल्वे मार्गांसाठी ३८९ कोटी रुपये देण्यात आले असून ही रक्कम मागील वर्षाच्या तुलनेत ७५ टक्के अधिक आहे. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी ६०९ कोटी रुपये, ट्राफिक फॅसिलिटीसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नागपूर मार्गे भुसावळ-खडगपूर आणि इटारसी-विजयवाडा फ्रेट कॉरिडोरची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. याशिवाय अजनी सॅटेलाईट टर्मिनल, नागपूर रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण, रेल्वे ओव्हरब्रिज, रेल्वे अंडरब्रिज या कामासाठी निधी मिळाला आहे. सध्या नागपूर विभागात वर्धा नागपूर व चौथी रेल्वे लाइन, वर्धा-बल्लारशाह थर्ड लाइन, इटारसी-नागपूर थर्ड लाइन, अमरावती-नरखेड रेल्वे मार्गाचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
..............
वर्धा-कळंब सेक्शन मार्च २०२२ पर्यंत होणार पूर्ण
विदर्भ आणि मराठवाड्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या वर्धा-नांदेड या रेल्वे मार्गासाठी अर्थसंकल्पात भरपूर निधी देण्यात आला आहे. या प्रकल्पाचे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्च २०२२ पर्यंत वर्धा ते कळंब या सेक्शनचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
.............