आईवडिलांच्या वादाला वैतागले; दोन अल्पवयीनांनी जीवन संपविले; समाजमन हादरले
By योगेश पांडे | Updated: May 9, 2023 21:51 IST2023-05-09T17:38:17+5:302023-05-09T21:51:14+5:30
Nagpur News आईवडिलांच्या वादातून तणावात आल्यामुळे २४ तासांत दोन अल्पवयीनांनी राहत्या घरीच गळफास घेत आत्महत्या केली.

आईवडिलांच्या वादाला वैतागले; दोन अल्पवयीनांनी जीवन संपविले; समाजमन हादरले
योगेश पांडे
नागपूर : लहान मुलांसमोर आईवडिलांनी वाद टाळले पाहिजे, असे तज्ज्ञांकडून वारंवार सांगितले जात असले तरी त्याकडे समाजात सर्रासपणे दुर्लक्ष केले जाते. याचा परिणाम लहान मुलांच्या मानसिकतेवर होतो. आईवडिलांच्या वादातून तणावात आल्यामुळे २४ तासांत दोन अल्पवयीनांनी राहत्या घरीच गळफास घेत आत्महत्या केली. अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पांढराबोडी परिसरात अवघ्या १५ वर्षीय मुलाने गळफास घेत जीव दिला, तर अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत १६ वर्षीय मुलीने आयुष्य संपविले. या दोन्ही आत्महत्यांचे कारण ऐकून पोलिसांनादेखील धक्काच बसला.
विनय अमित मसराम (१५, पांढराबोडी) असे मृत मुलाचे नाव आहे. विनय हा नववीत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या मोठ्या बहिणीने मागील वर्षी आत्महत्या केली होती. त्यानंतर तो बराच अबोल झाला होता. त्यातच त्याच्या आईवडिलांचा सतत विविध कारणांवरून वाद व्हायचा. विनय यामुळे मनातून अस्वस्थ होता. १५ दिवसांअगोदर त्याच्या आईवडिलांचे परत मोठे भांडण झाले व त्याची आई माहेरी निघून गेली. यानंतर विनयच्या मनावरील ताण आणखी वाढला होता. सोमवारी दुपारच्या सुमारास त्याचे वडील पेंटिंगच्या कामावर गेले होते. घरी कुणीच नसताना विनयने लाकडी बल्लीला चादरीच्या साहाय्याने गळफास घेतला. वडील सायंकाळी पावणेसात वाजता घरी आले असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. वडिलांनी दिलेल्या सूचनेवरून अंबाझरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. वर्षभरातच मसराम दाम्पत्याने मुलगी व मुलगा गमावले असून, या घटनेमुळे त्याच्या आई-वडिलांना धक्का बसला आहे. शिवाय परिसरातील नागरिकांमध्येही दु:खाचे वातावरण आहे.
बाहेरगावावरून वडील आले अन् मुलीने जीव दिला
अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत नंदिनी सयाजी गोरे (१६, द्वारकापुरी गल्ली क्रमांक दोन) या मुलीने आत्महत्या केली. तिचे वडील बाहेरगावी नोकरी करतात. ते नागपूरला आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा घरगुती कारणावरून पत्नीशी वाद झाला. यामुळे नंदिनी तणावात आली व तिने आईला वाद न घालण्यास सांगितले. यातून आईने तिला रागावले. अगोदरच तणावात असलेली नंदिनी प्रचंड संतापली व तिने बेडरूममध्ये जाऊन सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या कुटुंबीयांनी दरवाजा उघडला असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. सयाजी गोरे यांच्या सूचनेवरून अजनी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिच्या या पावलामुळे घरच्यांना मोठा धक्का बसला आहे.
मुलांसमोर वाद नकोच
दैनंदिन जीवनात लहानसहान कारणांवरून पती-पत्नी मुलांसमोर वाद घालताना दिसून येतात. यामुळे मुलांच्या मनावर नकळतपणे नकारात्मक परिणाम होत असतो. यातूनच त्यांच्यामध्ये लहान वयातच तणाव वाढायला लागतो. त्याचीच परिणिती टोकाचे पाऊल उचलण्यात होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांसमोर वाद टाळलेच पाहिजे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.