फॉरवर्ड ब्लॉक लढवणार १५ जागा : श्रीकांत तराळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 22:23 IST2019-09-27T22:21:46+5:302019-09-27T22:23:39+5:30
एकेकाळी दबदबा असलेला ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक (एआयएफबी) सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. पक्षातर्फे राज्यात १५ जागा लढवण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष श्रीकांत तराळ यांनी दिली.

फॉरवर्ड ब्लॉक लढवणार १५ जागा : श्रीकांत तराळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. एकेकाळी दबदबा असलेला ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक (एआयएफबी) सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. पक्षातर्फे राज्यात १५ जागा लढवण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष श्रीकांत तराळ यांनी दिली.
तराळ यांनी सांगितले की, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाला ८० वर्षाची परंपरा आहे. २२ जून १९३९ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या पक्षाची स्थापना केली होती. विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे यांनी या पक्षाची धुरा सांभाळताना विदर्भात पक्षाला वैभव प्राप्त करून दिले होते. १७ आमदार आणि ३ खासदार असलेला हा पक्ष होता. आज पक्षाची तितकी ताकद नसली तरी पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी संघटन बांधणीवर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्याची परिस्थिती अतिशय भयावह आहे. अशा परिस्थितीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांची खऱ्या अर्थाने गरज आहे. या निवडणुकीत शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार आणि स्वतंत्र विदर्भ राज्य हे आमचे प्रमुख मुद्दे राहणार असल्याचेही तराळ यांनी सांगितले.