शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी १५ भरारी पथके, बोगस बियाणे विकल्यास होईल कारवाई
By गणेश हुड | Updated: April 25, 2023 16:40 IST2023-04-25T16:38:01+5:302023-04-25T16:40:19+5:30
खत व बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक होवू नये यासाठी सोमवारी विभागाची आढावा बैठक घेण्यात आली

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी १५ भरारी पथके, बोगस बियाणे विकल्यास होईल कारवाई
नागपूर : खरिपाचा हंगाम आता दीड महिन्यावर आलेला आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा वेळेत मिळाव्यात व योग्य किमतीत मिळाव्यात, यासाठी कृषी विभागाच्या गुणनियंत्रक विभागाच्या वतीने दक्षता घेतली जात आहे. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी १५ भरारी पथके गठित करण्यात आली आहे.
कृषी निष्ठांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले जातात. यामध्ये नमुना योग्य नसल्यास विक्री बंदचे आदेश दिले जातात. काही प्रकरणात विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हा देखील दाखल केला जातो. खत व बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक होवू नये यासाठी सोमवारी विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. यात संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आल्याची माहिती विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
बोगस बियाणे विकल्यास होईल कारवाई
खताची जादा भावाने विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे प्रकार घडतात. जादा भावाने खते वा बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्ह्यात १५ पथकांचा वॉच
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुकास्तरावर एक असे १३, एक जिल्हास्तरावर आणि एक विभागस्तरावर असे पथकाचे गठण करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे.
- रविंद्र मनोहरे, उपसंचालक, कृषी विभाग