नागपुरात बँकेची १४.९० लाखांनी फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 19:14 IST2017-12-22T19:13:43+5:302017-12-22T19:14:52+5:30
वाहन खरेदी करण्यासाठी बँकेत कर्ज प्रकरण दाखल करून दोघांनी १४ लाख ९० हजारांचे कर्ज घेतले. मात्र, वाहन विकत घेतल्याची बनावट कागदपत्रे सादर करून वाहनच खरेदी केले नाही. कर्जाचे हप्ते थकल्यानंतर ही बनवाबनवी बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यावरून त्यांनी प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली.

नागपुरात बँकेची १४.९० लाखांनी फसवणूक
आॅनलाईन लोकमत
नागपूर : वाहन खरेदी करण्यासाठी बँकेत कर्ज प्रकरण दाखल करून दोघांनी १४ लाख ९० हजारांचे कर्ज घेतले. मात्र, वाहन विकत घेतल्याची बनावट कागदपत्रे सादर करून वाहनच खरेदी केले नाही. कर्जाचे हप्ते थकल्यानंतर ही बनवाबनवी बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यावरून त्यांनी प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली.
विश्वास पंजाबराव वानखेडे आणि माधव सुभाष बाबलसरे (बेलसरे) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांचे वय काय, ते कुठे राहतात, काय करतात त्याबाबत पोलिसांकडून माहिती स्पष्ट करण्यात आली नाही.
बँक आॅफ इंडियाच्या त्रिमूर्तीनगर शाखेत ७ जून २०१७ ला आरोपी वानखेडे आणि बेलसरे यांनी वाहन विकत घेण्यासाठी कर्ज प्रकरण सादर केले. ग्रेस टोयोटोच्या शोरूम मधून वाहन घ्यायचे आहे, असे दाखवत कोटेशन तसेच अन्य कागदपत्रेही सादर केली. त्यानंतर बँकेच्या मागणीनुसार, बनावट कागदपत्रे, ओळखपत्रे दिली. सर्व कागदपत्रे (बनावट) मिळाल्यानंतर बँकेने त्यांना १४ लाख, ९० हजार रुपयांचे वाहन कर्ज मंजूर केले. ही रक्कम उचलल्यानंतर आरोपींनी सदर वाहन खरेदी न करता या रकमेचा गैरवापर केला. दरम्यान, कर्जाचे हप्ते थकल्यामुळे बँकेच्या वसुली अधिकाºयांनी आरोपींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा संपर्कच होत नसल्याने त्यांनी दिलेल्या पत्तावर चौकशी केली. तो पत्ताही बनावट असल्याचे लक्षात आल्यामुळे बँकेतर्फे अनिल प्रेमदास राऊत (वय ५६, रा. गुरुदेव अपार्टमेंट) यांनी प्रतापनगर ठाण्यात तक्रार अर्ज दिला. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशीनंतर गुरुवारी उपरोक्त आरोपींवर गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
बँक अधिकाऱ्यांनी काय केले?
बनावट कागदपत्रे सादर करून वाहनाच्या नावावर कर्ज घेण्याचे आणि बँकेला गंडा घालण्याचे प्रकार यापूर्वीही प्रतापनगर, एमआयडीसी ठाण्यात नोंदले गेले आहेत. लहानसहान रकमेचे कर्ज मागणाराला विविध कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही बँक अधिकारी झुलवितात. विविध प्रकारचे तारण आणि त्याची बारीकसारीक चौकशी केल्यानंतरच कर्जाची रक्कम देतात. या प्रकरणात अधिकारी काय करीत होते, असा प्रश्न आहे. कर्जाची रक्कम देण्यापूर्वी वाहन कंपनीच्या वितरकाकडून आरोपींनी वाहन खरेदी केल्याची खात्री बँक अधिकाऱ्यांनी का करून घेतली नाही, असाही प्रश्न पोलिसांना पडला आहे.