अतिवृष्टीमुळे विभागात १.३५ लाख हेक्टर शेतीचे नुकसान; वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2022 21:07 IST2022-07-19T21:06:54+5:302022-07-19T21:07:26+5:30
Nagpur News अतिवृष्टी व पुरामुळे नागपूर विभागातील शेतीच्या नुकसानाचा मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. शेतकऱ्यांना तातडीने मदत देता यावी, यासाठी वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

अतिवृष्टीमुळे विभागात १.३५ लाख हेक्टर शेतीचे नुकसान; वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश
नागपूर : अतिवृष्टी व पुरामुळे नागपूर विभागातील शेतीच्या नुकसानाचा मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. नागपूर विभागात सुमारे १.३५ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत देता यावी, यासाठी वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
आढावा बैठकीअगोदर फडणवीस यांनी वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांतील पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा केला. अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतामध्ये उभे राहण्याचीदेखील स्थिती नाही. बऱ्याच ठिकाणी दुबार पेरणी वाया गेली आहे आणि शेती खरडल्या गेल्यामुळे तेथे पुन्हा पेरणीसुद्धा होऊ शकत नाही. अशी ठिकाणी मदत देताना वेगळा विचार करावा लागणार आहे. गेल्यावेळी झालेल्या नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेच नाहीत, असे लक्षात आले आहे. त्यामुळे आता मदत जाहीर करताना तो भागसुद्धा विचारात घ्यावा लागेल, असे फडणवीस यांनी सांगितले.
गडचिरोलीसाठी दीर्घकालीन योजनांचा आराखडा तयार करणार
गडचिरोली जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाळ्यात तेथे अनेक गावांची कनेक्टिव्हिटी तुटते. याशिवाय अंतर्गत भागांमध्ये स्थिती खूप बिकट होते. त्यामुळे यासाठी दीर्घकाळ उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यास प्रशासनाला सांगण्यात आले असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सप्टेंबरच्या अतिवृष्टीसाठी तयारीचे निर्देश
शेतकऱ्यांच्या कर्जपुरवठ्यासाठी निकराने प्रयत्न करावे, अशी सूचना फडणवीस यांनी केली. सर्वसाधारणत: सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी होते. यंदादेखील अशी शक्यता विचारात घेऊन त्यादृष्टीनेही नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.